आरक्षणाची गरज, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर प्रभावी भाष्य; चित्रपटातील प्रत्येक घटक समाजाने समजून घेण्याची गरज — रामभाऊ डोंगरे
काटा वृत्तसेवा I नागपूर/ प्रतिनिधी
“जयंती २” हा केवळ मनोरंजनाचा चित्रपट नसून सामाजिक वास्तव, जातिभेद, शैक्षणिक संघर्ष आणि संविधानिक हक्क यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. समाजातील प्रत्येक घटकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा,” असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकाऱ्यांसोबत ‘जयंती २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर डोंगरे यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात चित्रपटाच्या आशयाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला असून, दिग्दर्शक आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे, असे त्यांनी नमूद केले.
“प्रत्येक दृश्य काहीतरी देऊन जाते”
चित्रपटातील जवळपास प्रत्येक प्रसंग प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो, असे डोंगरे यांनी म्हटले. विशेषतः जातिभेद, वर्णव्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक विषमता यांचे परिणाम सहज समजतील अशा पद्धतीने चित्रपटातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षणाच्या प्रश्नाकडे केवळ राजकीय किंवा आर्थिक दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील ऐतिहासिक सामाजिक विषमता आणि संधीतील असमानता समजून घेण्याची गरज असल्याचा आशय चित्रपटातून प्रभावीपणे मांडला जात असल्याचे डोंगरे म्हणाले.

आरक्षणाच्या चर्चेला सामाजिक संदर्भाची जोड
आजच्या समाजात आरक्षण, उपवर्गीकरण आणि आर्थिक निकषावर आधारित आरक्षण याबाबत विविध मतप्रवाह आहेत. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या उद्देशाकडे आणि त्याच्या सामाजिक संदर्भाकडे प्रेक्षकांनी चिकित्सकपणे पाहावे, असा संदेश चित्रपट देतो, असे डोंगरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
त्यांच्या मते, आरक्षणाकडे केवळ गरिबी निर्मूलनाच्या उपाययोजनेप्रमाणे पाहणे योग्य नाही; सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या प्रश्नाचाही त्यात विचार केला जातो. चित्रपट या विषयावर अनेक प्रसंगांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतो.
‘पायल’च्या संघर्षातून शिक्षणातील विषमतेचे चित्रण
चित्रपटातील ‘पायल’ या आदिवासी मुलीची व्यक्तिरेखा विशेष लक्षवेधी असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. शिक्षण मिळवण्यासाठी तिला करावा लागणारा संघर्ष, उच्च शिक्षणाच्या टप्प्यावरही तिला सामोरे जावे लागणारे पूर्वग्रह आणि भेदभाव यांचे चित्रण मनाला भिडणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पायल आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तिच्याकडे पूर्वी वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या मित्रांचा दृष्टिकोन बदलतो, हा बदलही चित्रपटाने मार्मिकपणे मांडल्याचे ते म्हणाले.

संविधानिक मूल्ये आणि विवेकाचा संदेश
महापुरुषांच्या संघर्षातून आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे वंचित समाजातील अनेक घटकांना शिक्षण आणि सामाजिक प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्याचा संदर्भही चित्रपटात मांडला असल्याचे डोंगरे यांनी नमूद केले. अंधश्रद्धेला नाकारून विवेक, शिक्षण, समानता आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार करण्याची गरज चित्रपट अधोरेखित करतो, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाचा अंतिम संदेश माणुसकीला केंद्रस्थानी ठेवण्याचा आहे. जात, धर्म, आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक पार्श्वभूमी यापलीकडे प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहावे, हा विचार समाजासाठी महत्त्वाचा असल्याचे डोंगरे यांनी म्हटले.

“कुटुंबासह चित्रपट पाहा”
“‘जयंती २’ प्रत्येक सामाजिक स्तरातील व्यक्तीने पाहावा. पालकांनी आपल्या मुलांसोबत हा चित्रपट पाहून त्यातील विषयांवर चर्चा करावी. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र आणि शेजाऱ्यांनाही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन रामभाऊ डोंगरे यांनी केले.
चित्रपट पाहिल्यानंतरही अनेक पैलू पुन्हा जाणवू शकतात, त्यामुळे आपण हा चित्रपट पुन्हा पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“चित्रपट पाहणे हा केवळ मनोरंजनाचा अनुभव न राहता, त्यातून आपण समाजाकडे कोणत्या नजरेने पाहतो, समानतेचा अर्थ काय समजतो आणि संविधानिक मूल्ये आपल्या आचरणात किती उतरवतो, याचा विचार करण्याची संधी मिळावी,” अशी अपेक्षा डोंगरे यांनी व्यक्त केली.










