का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त नागपूरात विशेष शिबिरांचे आयोजन
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “सामाजिक समता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. हा उपक्रम ८ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी त्वरित सेवा शिबिरे
या सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष त्वरित सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेला गती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून तत्काळ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रसार
डॉ. आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची पायाभरणी केली. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच वंचित घटकांना न्याय मिळावा या हेतूने हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यघटनेतील तरतुदींनुसार अनुसूचित जाती व जमातींच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यावर भर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर कार्यालयामार्फत या कालावधीत विशेष शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.
संपर्क व वेळापत्रक
संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे किंवा ई-मेल, एसएमएस किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, पालक व विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यालयात भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे यांनी केले आहे.











