तामिळनाडू : अभिनेता विजय थलपती बनले राज्याचे नवे मुख्यमंत्री

विजय युगाची तामिळनाडूत दमदार सुरुवात

अभिनेता विजय थलपती बनले राज्याचे नवे मुख्यमंत्री

पहिल्याच निर्णयात 200 युनिट मोफत वीज

चेन्नई : C. Joseph Vijay यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडले असून, ‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) पक्षाने अवघ्या दोन वर्षांत सत्ता मिळवत मोठा राजकीय चमत्कार घडवला आहे. विजय यांनी शनिवारी चेन्नई येथे तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राजभवनात पार पडलेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यपाल R. N. Ravi यांच्या हस्ते विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते या सोहळ्यास उपस्थित होते.

शपथविधीत राज्यपालांनी भाषणावर घेतली हरकत

तमिळ भाषेत शपथ घेत असताना विजय यांनी ठरवून दिलेल्या मजकुराव्यतिरिक्त काही शब्द बोलण्यास सुरुवात केली. यावेळी राज्यपालांनी तत्काळ त्यांना थांबवत, “फक्त अधिकृत मजकूरच वाचा,” अशी सूचना दिली. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.

विजय यांच्यासोबत 9 मंत्र्यांची शपथ

मुख्यमंत्री विजय यांच्यासह एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ. के.जी. अरुणराज, के.ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी.के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, पहिल्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांतील एकाही आमदाराला स्थान देण्यात आलेले नाही.

पहिल्याच दिवशी मोठे निर्णय

मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच विजय यांनी तत्काळ कामाला सुरुवात केली. पहिल्याच आदेशात त्यांनी राज्यातील जनतेसाठी 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आणि अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे निर्देशही देण्यात आले.

दोन वर्षांत सत्तेपर्यंतचा थरारक प्रवास

विजय यांच्या TVK पक्षाची स्थापना अवघ्या दोन वर्षांपूर्वी झाली होती. तरीही पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 234 पैकी तब्बल 108 जागा जिंकत सर्वांना धक्का दिला. काँग्रेस, CPI, CPM, VCK आणि IUML या मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह विजय यांच्याकडे 121 आमदारांचे बहुमत आहे. तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा 118 इतका आहे.

60 वर्षांनंतर तामिळनाडूत ‘नॉन-द्रविडियन’ मुख्यमंत्री

1967 नंतर प्रथमच तामिळनाडूमध्ये द्रविडवादी पक्षांव्यतिरिक्त अन्य पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेवर आला आहे. यापूर्वी काँग्रेसचे M. Bhakthavatsalam यांनी 1963 ते 1967 या काळात मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यामुळे विजय यांचा शपथविधी तामिळनाडूच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News