धापेवाडा येथे विज कोसळून मृत्यू पावलेल्या कुटुंबाचे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावकुळे व आमदार डाॅ. आशिष देशमुख यांचेकडुन सांत्वन
तीन्ही मृतदेहांवर साश्रुनयनांनी अग्निसंस्कार
का टा वृत्तसेवा I प्रविण अडागले/ भूषण सवाईकर/ संजय श्रीखंडे
नागपूर : काल जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात धापेवाडा (बु.) येथील शेतात काम करत असताना शेतामध्ये विज पडून वंदना प्रकाश पाटील (42), व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील (18) तसेच शेतात काम करणाऱ्या निर्मलाताई रामचंद्र पराते (60) या तीघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आज सकाळी 11 वाजता धापेवाडा येथील स्मशानभुमीत तीन्ही मृतदेहांवर साश्रुनयनांनी अग्निसंस्कार करण्यात आले. धापेवाडयासह परिसरातील नागरिक व सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया सेख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजीत शोकसभेत विवीध पक्षाच्या पदाधिकार्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. आज धापेवाडयात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
आज दोन्ही कुटुंबास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी भेट देवून पिडीत कुटुंबांचे सांत्वन केले. शासनाकडून प्रति व्यक्ती 4 लक्ष रूपया धनादेश देत आर्थिक मदत केली. तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळेस जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, डाॅ. राजीव पोतदार, एसडीओ संपत खलाटे, तहसिलदार विकास बिक्कड, मनोहर कुंभारे, इमेश्वर यावलकर, अजय वाटकर, संदिप उपाध्याय, बाबा कोढे, मंगेश चोरे, गोविंदा शेट्ये इ. उपस्थित होते.
शेतात मेहनतीने खत टाकणाऱ्या हातांवर वीज कोसळली…
ही अत्यंत दुःखद आणि काळजाला चटका लावणारी दुर्घटना आहे. वीज कोसळून एका आईचा व तिच्या एकुलत्या मुलाचा आणि शेतमजुरी करणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू होणे, हे केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी हृदयद्रावक घटना आहे.
मृतका वंदना पाटील यांचा मुलगा ओम, हा दुसरे दिवशी गणेश चतुर्थी असल्याने गणपतीची मूर्ती घेऊन घरी आला. आणि मुर्ती घरी ठेवून आईच्या मदतीला शेतात गेला होता. अचानक विजेचा जोरदार कडकडाट होवून क्षणार्धात वीज कोसळून या भयंकर घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. याचवेळी धुऱ्याजवळ काम करणाऱ्या चार महिला थोडक्यात बचावल्या.
‘‘आकाशातून कोसळली वीज, अन् एका क्षणात मातृत्व, भातृत्व आणि मायेचा आधार हरवला…’’
घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वंदना प्रकाश पाटील यांचे पती प्रकाश पाटील यांचे एक वर्षापुर्वीच कर्करोगाने निधन झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर आई वंदना यांनी वडिलांचे स्थान घेत आपल्या दोन्ही मुलांना, मुलगा ओम आणि संस्कृतीला मोठं करण्याचा निर्धार केला. ‘ओम’ फेटरी येथील पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये शिकत होता तर मुलगी ‘संस्कृती’ अवघ्या नववीत नगर परिषद कळमेश्वरच्या शाळेत शिकत आहे. परंतू नियतीला हे मुळीच मान्य नव्हतं.
एक वर्षापुर्वी वडिलांचे छत्र हरविलेली संस्कृती क्षणात ‘आई व भावाच्या’ अचानक जाण्याने कायमची पोरकी झालीआहे. अशा प्रसंगी संवेदना व्यक्त करणे अवघड असते. ‘संस्कृती’सारख्या मुलीवर ओढवलेला दुःखद प्रसंग मन हेलावून टाकतो. ही घटना एवढी वेदनादायक आहे की, ज्यांनी प्रिय व्यक्तींना गमावलं त्यांनी डोळ्यांत अश्रू साठवण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. या सर्व कुटुंबांना या अपघातातून सावरण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना.
गडगडाटी वीजेपासून बचावासाठी सतर्कता गरजेची : जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्युत्पातात सुरक्षा रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले
नागपूर : जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून विद्य्योत्पातात सुरक्षा रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे व आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी तसेच इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.
डाॅ. विपीन इटनकर यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील नागरिकांना वीज पडण्याच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील निवडक प्रखंडांमधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये वज्रपात सुरक्षा रथ फिरवला जाईल आणि तेथील नागरिकांना आकाशीय वीज पडण्यापासून बचावाचे उपाय सांगितले जातील.
ते पुढे म्हणाले की, दरवर्षी आकाशीय वीजेमुळे अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू होतो. या अकाली मृत्यूमुळे केवळ कुटुंबांचे नुकसान होत नाही, तर राज्यालाही अपूरणीय हानी होते. ज्या भागांमध्ये अशा नैसर्गिक आपत्तींची शक्यता जास्त आहे, त्या भागांमध्ये प्राधान्याने हा रथ जाईल आणि जनजागृती केली जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांनी आत्मीयतेने नागरिकांना उद्देशून सांगितले की, वीज पडण्याची शक्यता असताना घरात असाल, तर विद्युत उपकरणांपासून दूर राहा. वायर असलेल्या टेलिफोनचा वापर टाळा. कपडे वाळवण्यासाठी ताराऐवजी जूट किंवा सूती दोर वापरा. घराबाहेर असाल, तर झाडाखाली आश्रय घेऊ नका. उंच इमारतींच्या परिसरात जाणेही टाळण्याचे आवाहन केले. जनजागृती रथामार्फत दिली जाणारी माहिती गांभीर्याने घेण्याचे आवाहन करत सांगितले की, स्वतः सतर्क राहा आणि इतरांनाही सजग व जागरूक राहण्यासाठी प्रेरित करा.















Users Today : 3
Users Yesterday : 11