नागपुरातून अल्पवयीन युवती प्रियकरासोबत बिहारला पळाली;
पोलिसांनी शोध घेऊन सुखरूप परत आणले
⚠️ ALERT : अल्पवयीन मुलींनी सोशल मीडियावरील ओळखींबाबत सतर्क राहावे, पालकांनीही मुलांच्या हालचालींकडे विशेष लक्ष द्यावे.
नागपूर : पोलिस भरती प्रक्रिया पूर्व प्रशिक्षणासाठी आई-वडिलांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला नागपूर येथील एका खासगी प्रशिक्षण केंद्रात दाखल केले होते. मात्र इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या बिहार येथील एका अल्पवयीन युवकाच्या प्रेमात पडून ती युवती घरच्यांना न सांगता पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिचा शोध घेऊन तिला सुखरूप नागपुरात परत आणले.
संबंधित मुलीचा प्रवेश नागपूरमधील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पोलिस प्रशिक्षण अकॅडमीत करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान तिची ओळख बिहारमधील इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाशी झाली. मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दोघांमध्ये सातत्याने सोशल मीडियावर चॅटिंग सुरू होते.
दरम्यान, युवकाने तिला बिहारला येण्यास सांगितले. प्रवासासाठी पैसे नसल्याने युवतीने आई-वडिलांना अकॅडमीचे शुल्क भरण्याचे कारण सांगून ७ हजार रुपयांची मागणी केली. पालकांनी पैसे पाठवल्यानंतर तिने ते अकॅडमीत जमा न करता थेट प्रयागराज येथे पलायन केले.
प्रयागराज येथे युवक तिच्या भेटीस आला आणि त्यानंतर दोघेही युवकाच्या गावी बिहारमधील महागामा येथे गेले. दरम्यान, युवती प्रशिक्षण केंद्रातून बेपत्ता झाल्याची माहिती अकॅडमी प्रशासनाने तिच्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी कोराडी पोलीस ठाणे येथे मिसिंगची तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तपास सुरू केला. निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बिहारमधील महागामा येथे पोहोचले आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप नागपुरात परत आणले.
🚨 सतर्कतेचा इशारा (Alert Message):
सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी अनेकदा धोकादायक ठरू शकतात. अल्पवयीन मुलांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना विशेष काळजी घ्यावी. पालकांनीही मुलांच्या ऑनलाइन हालचाली, संवाद आणि मानसिक बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.









