नागपुरात नव्या बांधकामांसाठी पार्किंग अनिवार्य
वाहतूक कोंडीवर उपाययोजना
नागपूर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या बांधकामांमध्ये पार्किंगची व्यवस्था अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.

बैठकीत सांगण्यात आले की, भाजी मार्केट, मटण-मच्छी मार्केट, फूड मॉल, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट आणि नेताजी मार्केट यांसारख्या सर्व नव्या प्रकल्पांना पुरेशी पार्किंग व्यवस्था बंधनकारक असेल. पार्किंगची सुविधा नसल्यास अशा प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही. आवश्यकतेनुसार मल्टी-लेव्हल पार्किंगसारख्या आधुनिक उपाययोजनांचा अवलंब करण्याचेही निर्देश देण्यात आले.

महानगरपालिका, एमएसआयडीसी, मिहान आणि म्हाडा यांच्यामार्फत सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. शहरातील नऊ झोनमध्ये ८९ किलोमीटर लांबीचे १३५ सिमेंट रस्ते उभारण्याचे नियोजनही यावेळी सादर करण्यात आले.
शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर झोननिहाय भाजी मार्केट, मटण-मच्छी मार्केट, फूड मॉल आणि हॉकर झोन उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. यासाठी ‘एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’मध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः शाळा व महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या, फुटपाथवरील दुकाने आणि अवैध हुक्का पार्लर हटवण्यावर भर देण्यात येणार आहे.

याशिवाय, शहरातील पाणी गळती रोखणे, कचरा व्यवस्थापन सुधारणे, सांडपाणी व पावसाळी नाल्यांचे नियोजन, तसेच विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी निधी यावरही चर्चा करण्यात आली. दाभा येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, विभागीय क्रीडा संकुल आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या विकासकामांचा आढावाही घेण्यात आला.
प्रकल्पांमध्ये सौरऊर्जेचा वापर, सीसीटीव्ही यंत्रणा आणि कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.








