खरात प्रकरणावरून राजकारण तापले
विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
नागपूर : नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणासह भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील कारवाईवरून राज्यातील राजकारण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र टीका केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, गुन्ह्यांकडे पाहताना धर्म किंवा जात यांचा विचार करणे चुकीचे आहे. “खरातच्या जागी एखादा मुस्लिम असता, तर मोठा गाजावाजा झाला असता,” असे ते म्हणाले. तसेच, चुकी करणाऱ्याला स्पष्टपणे चुकीचे म्हणण्याचे धैर्य समाजात असावे, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह
यावेळी वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावरही टीका केली. घोषित कर्जमाफी ही केवळ दिखाऊ असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. “जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत त्यांना खरी मदत मिळाल्याचे म्हणता येणार नाही,” असे ते म्हणाले.
विमा योजनांवर बोलताना त्यांनी सांगितले की, या योजनांमुळे विमा कंपन्यांचाच अधिक फायदा होत असून, नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत.









