नागपुरात ९० कोटी २५ लाखांचा सायबर घोटाळा उघड!
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून फसवणूक; आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा संशय, महिलांसह ६ जणांना अटक
नागपूर : नागपूर शहर सायबर पोलिसांनी तब्बल ९० कोटी २५ लाख रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून फसवणूक करणाऱ्या टोळीतील महिलांसह सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे देशभरात पसरलेल्या मोठ्या सायबर रॅकेटचा धक्कादायक तपशील समोर आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे दोन ठिकाणी धाड
दिघोरी नाका परिसरातील पवनपुत्र नगर आणि हुडकेश्वर येथील गजानन नगर परिसरातील एका घरातून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने ५ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान कारवाई करत संबंधित ठिकाणी धाड टाकली.
तब्बल २३६ एटीएम कार्डसह मोठा मुद्देमाल जप्त
छाप्यात पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य लागले. त्यामध्ये २३६ एटीएम कार्ड, ८२ पासबुक, ८५ चेकबुक, १८० कोरे चेक, ४५ सिमकार्ड, १३ रबर स्टॅम्प, १४ आधार कार्ड, ५ पॅन कार्ड आणि ४ मतदान कार्डांसह ३ आरसी कार्ड जप्त करण्यात आले.
याशिवाय १ स्वाइप मशीन, ७ बँक स्कॅनर, केवायसीशी संबंधित कागदपत्रे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

महिलांसह सहा आरोपी अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी उज्ज्वला ताराचंद राजगिरे (३२), इरफान वल्द इकबाल शेख (३२), मृणाली दिगांबर कांबळे (२६), निधीता अमित रामटेके (२२), आयुष चंद्रकांत रामटेके (२०) आणि आदित्य राहुल दुपारे (२०) यांना अटक केली आहे.
देशभरात १०४ गुन्हे व तक्रारींची नोंद
तपासादरम्यान आरोपींनी उघडलेल्या बँक खात्यांशी संबंधित व्यवहारांवर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये तब्बल १०४ गुन्हे व तक्रारी नोंद झाल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून झालेल्या संशयास्पद व्यवहारांचा तपास सध्या सुरू असून, फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय
या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. आरोपींचे देश-विदेशातील संपर्क, बँक खात्यांमधील व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास केला जात आहे.
या प्रकरणी नागपूर शहर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.





