नाना पटोलेंचा केंद्र व राज्य सरकारवर घणाघात; ‘मतचोरी, शेतकरी आत्महत्या आणि उधळपट्टी’वरून जोरदार हल्लाबोल!

यांच्यावर शेतकऱ्यांच्या हत्येचे गुन्हे दाखल करा : नाना पटोलेंचा केंद्र व राज्य सरकारवर घणाघात; ‘मतचोरी, शेतकरी आत्महत्या आणि उधळपट्टी’वरून जोरदार हल्लाबोल!

‘महाराष्ट्रात ४६ लाख मतदारांची अचानक वाढ कशी?’; १२ कोटींच्या आलिशान गाड्या आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरही उपस्थित केले प्रश्न

नवी दिल्ली, प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, शेतकरी आत्महत्या, महागाई आणि सरकारी खर्चावरून केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. भाजपवर लोकशाही आणि संविधान कमकुवत करण्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार-पाच महिन्यांत ४६ लाख मतदारांची वाढ कशी झाली, तसेच मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या वाढीचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी केली. मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. देशभरात ३२ कोटी मतदारांची मते कमी करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला;

शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर १२ कोटींच्या गाड्यांवरून सवाल

राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना व्हीआयपींसाठी ४४ आलिशान गाड्या खरेदी करण्याकरिता १२ कोटी रुपये मंजूर केल्याचा मुद्दा उपस्थित करत पटोले यांनी सरकारच्या खर्चावर टीका केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर ३४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीवरूनही त्यांनी कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले.

महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणींचा उल्लेख करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेची चौकशी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेच्या पैशांच्या वापराबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी पटोले यांनी केली.

0
0

Leave a Reply

Realted News