मातोश्री वृद्धाश्रमात विद्यार्थ्यांचे श्रमदान; वृद्धांशी संवाद साधत दिला सेवेचा संदेश

संगीत, कविता आणि आपुलकीच्या संवादातून वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

धापेवाडा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था अंतर्गत श्री कोलबा स्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धापेवाडा येथील इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन श्रमदान केले. पितृपर्वानिमित्त आयोजित या उपक्रमातून वृद्धांविषयी आदर, प्रेम आणि आई-वडिलांच्या सेवेचा संदेश देण्यात आला.

संस्थेच्या सचिव सुहास ताई केदार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम परिसराची स्वच्छता केली आणि वृद्धांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी संगीत शिक्षकांनी सुमधुर गीते सादर केली, तर काहींनी स्वरचित कविता व जुन्या गाण्यांच्या माध्यमातून वृद्धांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

वृद्धाश्रमाचे प्रमुख चंदन बटवे यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले. माजी मुख्याध्यापक उईके, महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा येथील संगीत शिक्षक नानोटी, श्री गणेश प्रासादिक शिक्षण संस्थेचे संगीत शिक्षक गडेकर आणि विज्ञान शिक्षक पवार यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका सौ. कांडलकर, बी. राठोड, एस. राठोड, प्राचार्य संजय कडू आणि शिपाई सुनील खंडाते यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘वृद्धांचा आदर करा, आई-वडिलांची सेवा करा आणि त्यांना प्रेम व आधार द्या,’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

0
0

Leave a Reply

Realted News