नीट पेपरफुटी प्रकरणाचा मोठा परिणाम
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
जंतर-मंतरवरील ३६ दिवसांच्या आंदोलनानंतर निर्णय; NTA चे ४७ अधिकारी बडतर्फ, परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची घोषणा
नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय समोर आला.
राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी दोन पानांचे सुमारे ५७५ शब्दांचे पत्र सार्वजनिक केले. या पत्रात त्यांनी विविध मुद्द्यांसह देशातील तरुणांच्या विश्वासाला धक्का बसल्याचा उल्लेख केला असून परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणांची गरज मान्य केली आहे.
“झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए”: अभिजीत दीपके
राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके म्हणाले, “ते म्हणायचे, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत; पण झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए.” आंदोलनाला देशभरातील युवकांचा मिळालेला पाठिंबा हा लोकशाहीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या १२ वर्षांत आंदोलनामुळे पहिलाच राजीनामा
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आंदोलनाच्या दबावामुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी ‘मी टू’ प्रकरणातील आरोपांनंतर राजीनामा दिला होता.

सीजेपीची प्रतिक्रिया : “कॉकरोच जिंकले, लोकशाही जिंकली”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत “कॉकरोच जिंकले… लोकशाही जिंकली” अशी प्रतिक्रिया दिली. आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावाही पक्षाने केला आहे.

सोनम वांगचुक : “हा शांततेचा आणि लोकशाहीचा विजय”
आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की,
“हा लोकशाहीचा, शांततेचा, संयमाचा आणि चिकाटीचा विजय आहे. देशभरातून रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन.”

NTA चे ४७ अधिकारी बडतर्फ; फौजदारी कारवाई
दरम्यान, राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA)ने नीट पेपरफुटी प्रकरणात ४७ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा
केंद्र सरकारने परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
- परीक्षा प्रक्रियेतील आउटसोर्सिंग पद्धतीत बदल.
- अत्याधुनिक तांत्रिक सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी.
- पेपरफुटीची शक्यता पूर्णपणे रोखण्यासाठी नवीन डिजिटल परीक्षा यंत्रणा.
- UPSC च्या ‘प्रतिभा सेतू’ पोर्टलद्वारे ४ वरिष्ठ महाव्यवस्थापक आणि १६ तरुण व्यावसायिकांची नियुक्ती.
- परीक्षा व्यवस्थेचे पारदर्शक व उत्तरदायी स्वरूप विकसित करण्यावर भर.

राजकीय व प्रशासकीय घडामोडींना वेग
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयातील दोन वरिष्ठ सचिवांची बदली केली होती. त्यानंतर NTA मधील अधिकाऱ्यांवर कारवाई आणि आता केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा, या घडामोडींमुळे देशातील परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल शब्द नाही:पोलिसांच्या अत्याचारावर मौन,
नुकसानभरपाईचे काय? प्रधानांच्या राजीनाम्यावर आंबेडकरांची टीका

‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी या निर्णयाची घोषणा करत राजीनाम्यामागील भूमिका मांडली. दरम्यान, या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत, “प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, कधीही न झुकणाऱ्यांना आता जनतेसमोर नाक रगडावे लागले आहे,” असा घणाघाती टोला लगावला आहे.
‘जेनझी’ने सरकारच्या झिंज्या उपटल्या: उद्याचा तिरंगा मार्च होणारच,
शिवाजी पार्कवर तरुणांचा विजयोत्सव साजरा करू – ठाकरे बंधू

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला. “हा देशभरातील तरुणाईचा आणि ‘जेनझी’चा ऐतिहासिक विजय असून, त्यांनी मस्तवाल सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना जमिनीवर आणले आहे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर, “पोलिसांच्या अत्याचारावर कारवाई झाली नाही, तर आता तरुणाईचा मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
साभार : दिव्य मराठी
हेही वाचा : दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ कळमेश्वरात विशाल मोर्चा






