प्रगतिशील शेतकरी बाबाराव कोढे यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’
नागपूर विभागातील सर्वोच्च कृषी सन्मानाने गौरव; शेतीतील नवकल्पना व मार्गदर्शनाची दखल
काटा वृत्तसेवा : आशिष देशमुख
कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील प्रगतिशील शेतकरी नीळकंठ ऊर्फ बाबाराव कोढे यांची राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-२०२४’ साठी नागपूर विभागातून निवड करण्यात आली आहे. शेती क्षेत्रात केलेले प्रयोग, फळबागांचे यशस्वी व्यवस्थापन, जोडव्यवसायांची उभारणी आणि शेतकऱ्यांना दिलेले मार्गदर्शन यांची दखल घेत शासनाने त्यांचा गौरव केला आहे.

सन २००२ मध्ये बाबाराव कोढे यांनी मौजा तेलकामठी येथे नाले व चढ-उतार असलेली बंजर जमीन खरेदी केली. अथक परिश्रमातून दगड-गोटे वेचून जमिनीचे सपाटीकरण केले आणि शेणखताचा वापर करून ती सुपीक बनवली. दुग्ध व्यवसायासाठी गायी व म्हशींचे पालन करताना त्यांनी शेती आणि पशुपालनाचा आदर्श संगम साधला.
फळबागांमधून लाखोंचे उत्पादन

नागपूर येथील निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संत्रा व मोसंबीची लागवड केली. सध्या त्यांच्या शेतात सुमारे १,८०० संत्र्यांची आणि ५०० मोसंबीची झाडे असून आंतरपीक म्हणून दरवर्षी आल्याची लागवड केली जाते. या फळबागांमधून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.
त्यांच्या नावासोबत पत्नी सौ. शालिनी कोढे यांचेही जमिनीमध्ये सहमालकी हक्क असून त्या शेती व दुग्ध व्यवसायाच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतात. कुटुंबाच्या सहकार्याने त्यांनी शेती पूर्णपणे प्रयोगशील आणि आधुनिक पद्धतीने विकसित केली आहे.
‘उद्यान पंडित’ पुरस्कारानेही सन्मानित
बाबाराव कोढे यांना यापूर्वी राज्य शासनाच्या ‘उद्यान पंडित-२०१७’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संत्रा, मोसंबी, सीताफळ, आंबा, पेरू यांसारख्या फळबागांसह कापूस व आले यांसारख्या पिकांचे आधुनिक व प्रयोगशील पद्धतीने उत्पादन घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसमोर यशस्वी शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.
सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान
स्वर्गीय सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या प्रेरणेने आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली बाबाराव कोढे यांनी सहकार क्षेत्रातही महत्त्वपूर्ण काम केले आहे. ते कळमेश्वर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था धापेवाडाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य महानंदाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. विविध सहकारी संस्थांवर त्यांनी संचालक म्हणूनही काम केले आहे.
कळमेश्वर खरेदी-विक्री संघामार्फत ‘सहकार भारत गॅस’ या नावाने भारत पेट्रोलियमची गॅस एजन्सी सुरू करून तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-२०२४’ जाहीर झाल्यानंतर बाबाराव कोढे यांच्यावर शेतकरी, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









