व्हेनेझुएलात भीषण भूकंप; मृतांचा आकडा 235 वर
4,300 हून अधिक जखमी, 39 हजार नागरिक बेपत्ता; ढिगाऱ्याखालून अजूनही मदतीसाठी आर्त हाका
कराकास, वृत्तसंस्था : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली असून आतापर्यंत 235 जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 4,300 हून अधिक नागरिक जखमी झाले असून सुमारे 39 हजार लोक बेपत्ता असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
बुधवारी देशात 1821 च्या काराबोबो युद्धाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सुट्टी होती. त्यामुळे बहुसंख्य नागरिक घरामध्ये उपस्थित होते. याच काळात आलेल्या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ढिगाऱ्याखालून मदतीसाठी आवाज
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, अनेक भागांमध्ये ढिगाऱ्याखालून अजूनही मदतीसाठी आवाज येत आहेत. बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या प्राथमिक अंदाजानुसार, या भूकंपामुळे 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता 44 टक्के आहे. तर मृतांचा आकडा एक लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता 30 टक्के असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

अर्थव्यवस्थेला मोठा फटका
या नैसर्गिक आपत्तीमुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 9.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाहक अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.
भारताची मदतीसाठी तत्परता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाच्या नेतृत्वाशी संवाद साधून मदतीची ऑफर दिली आहे. भारत सरकारने भूकंपग्रस्तांसाठी तातडीची मदत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ऑपरेशन अमिस्ताद’ची सुरुवात
भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाची दोन सी-17 वाहतूक विमाने मदत साहित्य घेऊन व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत.
या विमानांमधून भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल युनिट, वैद्यकीय पथके तसेच 35 टनांहून अधिक मदत सामग्री पाठविण्यात आली आहे. या संकटाच्या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
शेकडो नागरिक अडकल्याची भीती
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्तीग्रस्त भागात आंतरराष्ट्रीय बचाव पथके, वैद्यकीय मदत आणि मानवीय सहाय्य पोहोचू लागले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.





