सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात AISFचा निषेध
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या ताफ्याला काळे झेंडे
भंडारा, दि. २२ मार्च — राज्यातील सुमारे १८ हजार सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)तर्फे रविवारी तुमसर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. जनता दरबारासाठी दौऱ्यावर असताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलकांनी अडवून निषेध नोंदवला.
तुमसर येथील जुना बसस्थानक परिसरात आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून पत्रके फेकत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. महसूल कार्यालयात आयोजित जनता दरबारासाठी जात असताना हा प्रकार घडला.
AISFचे राज्याध्यक्ष वैभव चौपकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर भगतसिंग यांनी सेंट्रल असेम्ब्लीमध्ये केलेल्या आंदोलनाच्या शैलीची आठवण करून देणारी पत्रकफेक करण्यात आली, त्यामुळे या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे.

आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी वैभव चौपकर यांच्यासह अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजप सरकारवर खाजगीकरणाला चालना देत सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने “पालकमंत्र्यांपेक्षा पोलीस प्रशासन मोठे आहे का?” असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
इशारा आंदोलनाचा
राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत प्रत्येक मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा AISFचे राज्याध्यक्ष वैभव चौपकर यांनी दिला.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0