अफवेमुळे वरुडमध्ये इंधनासाठी नागरिकांची गर्दी
पोलिस बंदोबस्तात विक्री सुरू
काटा वृत्तसेवा I गणेश सरेटकर
अमरावती : वरुड शहरात इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून मंगळवारी रात्रीपासून पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. परिणामी, शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रकची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर यावलकर पेट्रोल पंपावर इंधन विक्री सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांच्या देखरेखीखाली इंधन वितरण सुरू आहे.

दरम्यान, वरुड व्यापारी संघ व कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबंधित पेट्रोल पंपाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच, साठेबाजी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करण्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी नायब तहसीलदार पंकज चव्हाण आणि पेट्रोल पंपचालक निळकंठ यावलकर उपस्थित होते.
वरुडचे तहसीलदार रामदास शेळके यांनीही नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच, पेट्रोल पंप चालकांना वाहनांशिवाय कॅनमध्ये इंधन देऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0