का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
सावनेर–कळमेश्वरमध्ये भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळावा उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा पुढाकार
पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३० जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होणार
प्रतिनिधी | सावनेर/कळमेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने सावनेर व कळमेश्वर येथे भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास दोन्ही तालुक्यांतील हजारो शेतकरी, नागरिक आणि लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ची माहिती
मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी राज्य शासनाने ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद केली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सहकारी, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण तसेच खासगी बँकांकडून घेतलेल्या पात्र पीक कर्जाचा समावेश करण्यात आला असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकीही ग्राह्य धरण्यात येणार आहे.

जाचक अटी शिथिल; ३० जुलैपूर्वी रक्कम जमा
पूर्वीच्या अनेक जाचक अटी शिथिल करण्यात आल्या असून जमीनधारणेची कमाल मर्यादाही लागू राहणार नसल्याचे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३० जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा हा ऐतिहासिक निर्णय प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा, या उद्देशानेच या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
‘शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी महत्त्वाची’
यावेळी बोलताना आमदार डॉ. देशमुख म्हणाले, शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या लक्षात घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विनाअट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती जाहीर केली असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास आणि आर्थिक अडचणी दूर करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख
राज्य सरकारने यापूर्वी शेतकऱ्यांचे जुने थकीत वीजबिल माफ करून मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. तसेच पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ६ हजार रुपयांबरोबरच राज्य सरकारकडूनही ६ हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेतून सध्या १,५०० रुपये दिले जात असून भविष्यात ही रक्कम २,१०० रुपये करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण विकास आणि रोजगाराला चालना
सावनेर–कळमेश्वर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पुढील चार वर्षांत पांदण रस्ते उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच लिंगा येथील ७० हजार कोटी रुपयांच्या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पामुळे सुमारे ३० हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत, संबंधितांकडून वसुली करून शेतकऱ्यांचे पैसे सुरक्षित परत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. राजीव पोतदार यांचे मार्गदर्शन
मेळाव्यात नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या निर्णयांची माहिती देत त्यांनी योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
या मेळाव्यास अशोक धोटे, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, संजना मंगळे, पियुष बुरडे, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), गटविकास अधिकारी (बीडीओ), तहसीलदार, विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी शासनाच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचे स्वागत करत आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.






