🌾 दुष्काळसदृश परिस्थितीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती

नागपूर/महाराष्ट्र | २५ सप्टेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. समिती जिल्हानिहाय पीक नुकसानीचे पंचनामे, पिण्याचे पाणी, चारा आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदतीचा आढावा घेणार आहे. विदर्भातील पावसाच्या तुटवड्यामुळे शेती व ग्रामीण भागातील परिस्थितीवरही समिती लक्ष ठेवणार आहे.
🏙️ नागपुरातील विकासकामांसाठी GIS मॅपिंग; भूमिगत सुविधांचीही डिजिटल नोंद

नागपूर शहर | नागपूर महानगरपालिका शहरातील इमारती, रस्ते, नागरी सुविधा आणि भूमिगत यंत्रणांचे GIS आधारित डिजिटल मॅपिंग करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटणकर यांच्या निर्देशानुसार या प्रणालीमुळे भविष्यातील विकासकामांचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि रस्ते वारंवार खोदण्याची समस्या कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनाही उपलब्ध पायाभूत सुविधांची डिजिटल माहिती देण्याचे नियोजन आहे.
🚨 भुसाच्या आडून गांजाची तस्करी; 25 किलो 430 ग्रॅम गांजा जप्त, दोघे ताब्यात
भंडारा : नागपूर अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने पालांदूर येथील भारत राईस मिल परिसरात कारवाई करत आयशर वाहनातून 25 किलो 430 ग्रॅम गांजा जप्त केला. भुसाच्या आडून गांजाची वाहतूक केली जात असल्याचे तपासात आढळले. जप्त गांजाची अंदाजे किंमत 12 लाख 71 हजार 500 रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार गांजाची खेप ओडिशातून भंडारा मार्गे नागपूरकडे नेली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
🔥 महाप्रसादात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर; आयोजक, कॅटरर्सविरुद्ध गुन्हा कठोर कारवाईचा इशारा
नागपूर : धंतोलीतील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित गणेश महाप्रसादाच्या कार्यक्रमात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केल्याप्रकरणी आयोजक आणि कॅटरर्सविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुमारे १५० ते २०० जणांसाठी आयोजित या कार्यक्रमात तपासणीदरम्यान दोन व्यावसायिक सिलिंडरसह एक घरगुती सिलिंडर व मोठी शेगडी आढळून आली. पुरवठा विभागाचे सहाय्यक पुरवठा अधिकारी पंकज जळेकर आणि पुरवठा निरीक्षक स्नेहल मांगे यांनी तक्रार दिली. कॅटरर्स प्रदीप दुबे यांचे नाव प्रकरणात नमूद असून, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे. पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक उत्सव, महाप्रसाद व अन्य मोठ्या कार्यक्रमांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
🚨 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तिजोरी खुली करण्याची विजय वडेट्टीवार मागणी
नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, ₹३१ हजार कोटींच्या पॅकेजपैकी केवळ ४९ टक्के निधीच मिळाला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य देऊन राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून मदत करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळी परिस्थितीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी वाढदिवसांचे भव्य सोहळे टाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
🚨ऑटोमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; पाच जणांवर गुन्हा; ₹१२.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती : घरगुती एलपीजी सिलिंडरमधून प्रवासी ऑटो रिक्षांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहिरम बाबा टेकडीजवळ, चांदूर रेल्वे रोड येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी चार ऑटो रिक्षांसह एकूण ₹१२ लाख ३१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेख जमीर शेख अल्लाउद्दीन, अल्तमश खान शब्बीर खान, अब्दुल कय्युम शेख मेहबुब, रविंद्र गोविंदराव वानखडे आणि शेख मुन्ना शेख शब्बीर यांच्याविरुद्ध २४ सप्टेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.








