बियाणे खरेदी : सावध राहा, पक्की पावती घ्या आणि फसवणूक टाळा!

बियाणे खरेदीत सावध राहा!

पक्की पावती घ्या आणि फसवणूक टाळा!

का टा वृत्तसेवा I प्रतिनिधी

नागपूर : खरीप हंगाम तोंडावर आला असून तालुक्यातील शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. मात्र बनावट बियाणे, खते व कीटकनाशकांच्या वाढत्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन कळमेश्वर तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घेणे अत्यावश्यक आहे. पावतीवर बियाण्याचा लॉट नंबर, बॅच नंबर, कंपनीचे नाव व खरेदीची तारीख स्पष्ट नमूद असावी. भविष्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत किंवा गुणवत्तेबाबत तक्रार उद्भवल्यास ही पावती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कायदेशीर पुरावा ठरू शकते.

याशिवाय बियाण्यांचे पाकीट सीलबंद आणि मोहरबंद असल्याची खात्री करावी. फाटलेले, शिवलेले किंवा उघडलेले पॅकेजिंग असलेली बियाणे खरेदी करू नयेत. तसेच बियाणे, कीटकनाशके आणि खतांवरील अंतिम मुदत व कंपनीचे अधिकृत सील तपासूनच खरेदी करावी, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

पेरणीनंतर बियाण्यांची रिकामी पिशवी, टॅग, वेष्टन आणि खरेदीचे बिल पीक कापणीपर्यंत सुरक्षित जतन करून ठेवावे. भविष्यात तक्रार दाखल करावयाची झाल्यास हे पुरावे अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर थेट पेरणी न करता घरच्या घरी उगवणक्षमता तपासण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासाठी १०० दाणे ओल्या कापडावर किंवा पोत्यावर ठेवून त्यांची उगवण तपासावी. ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवण झाल्यास अशा बियाण्यांचा वापर टाळावा.

प्रलोभनांपासून सावध राहा

शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत किंवा फिरत्या विक्रेत्यांकडून कृषी निविष्ठा खरेदी करू नये. कमी दर, जादा उत्पादन किंवा आकर्षक ऑफरच्या प्रलोभनाला बळी पडल्यास आर्थिक फसवणुकीचा धोका वाढतो. त्यामुळे बियाणे, खते आणि कीटकनाशके नेहमी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार यांनी केले आहे.

कृषी निविष्ठांबाबत कोणतीही शंका, तक्रार किंवा अडचण असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

0
0

Leave a Reply

Realted News