छेडछाड प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी
महिला पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या ताब्यात
नागपूर, प्रतिनिधी : वाठोडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. प्रणाली बेनके असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने आर्थिक व्यवहारासंदर्भात वाठोडा पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान संबंधित महिलेने तक्रारदाराविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि त्याला प्रकरणातून वाचवण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी एका खाजगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. मात्र, संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही.
लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने एसीबीने प्रणाली बेनके यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.









