NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत CJP चे जोरदार आंदोलन

NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत CJP चे जोरदार आंदोलन

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली, प्रतिनिधी : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने शनिवारी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पाच तासांचे आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाच दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली असून अन्यथा येत्या शनिवारी पुन्हा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

अभिजित दीपके हे शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाल्यानंतर थेट विमानतळावरून जंतर-मंतर येथे पोहोचले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही सहभाग घेतला. यावेळी CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका हे देखील उपस्थित होते. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी असलेले रांका नुकतेच लंडनहून भारतात परतले आहेत.

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रमुख रेल्वे स्थानके, बस स्थानके तसेच दिल्लीच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. शहरातील संवेदनशील भागांमध्ये १,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

आंदोलनादरम्यान सहा जण ताब्यात

आंदोलनाच्या वेळी समर्थक आणि विरोधक यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गुलाब हातात घेऊन पोहोचले सोनम वांगचुक

आंदोलनस्थळी सोनम वांगचुक हे गुलाबाचे फूल हातात घेऊन पोहोचल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली.

अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त

दरम्यान, अभिजित दीपके यांच्या महाराष्ट्रातील निवासस्थानीही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घराबाहेर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून पोलिसांची वाहने तैनात करण्यात आली आहेत. मात्र, दीपके यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

पुढील भूमिका काय?

CJP ने आपल्या मागणीवर ठाम भूमिका घेतली असून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पाच दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास १३ जून रोजी जंतर-मंतर येथे आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभिजित दीपके यांनी दिला आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत चालले. त्यानंतर अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांनी आंदोलनस्थळ सोडले आणि हळूहळू परिसर रिकामा झाला.

 

0
0

Leave a Reply

Realted News