नागपूर : मेयोचे विभागप्रमुख डॉ. जैस्वाल एसीबीच्या ताब्यात

🚨 ब्रेकिंग | नागपूर

मेयोचे विभागप्रमुख डॉ. जैस्वाल एसीबीच्या ताब्यात

फिटनेस प्रमाणपत्रासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी; लघुलेखकालाही ताब्यात

नागपूर | प्रतिनिधी : नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी मोठी कारवाई करत शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल आणि त्यांचे लघुलेखक आशिष मेटेकर यांना ताब्यात घेतले. फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे शासकीय वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आरटीओ अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्याचा आरोप

तक्रारदार हे वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असलेल्या तक्रारदाराला सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी वैद्यकीय मंडळाची शिफारस व फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक होते.

यासाठी ते मेयो रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर हजर झाले असता, प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पडताळणीत २० हजारांवर तडजोड; मात्र रक्कम स्वीकारली नाही

तक्रारदाराने नागपूर एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर २४ जून २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसल्याचे सांगण्यात आले.

३० जून रोजी एसीबीची कारवाई

लाचेची मागणी झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर ३० जून २०२६ रोजी एसीबीने डॉ. जैस्वाल आणि आशिष मेटेकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मेयोमध्ये यापूर्वीही एसीबीची कारवाई

मेयो रुग्णालयात यापूर्वीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीने कारवाई केली आहे. २०१७ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना औषध पुरवठादाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले होते. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथील नेत्ररोग विभागातही यापूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई झाली होती.

1
0

Leave a Reply

Realted News