ब्रेकिंग न्यूज | नांदेड हादरले!
शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह गोदावरी नदीत कार घालून आत्महत्या
वरिष्ठांकडून मानसिक छळाचा कथित आरोप
व्हॉट्सॲप स्टेटस आणि लॅपटॉपमधील नोटमुळे खळबळ
नांदेड | प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून कार नदीत झोकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती
भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे नांदेड शहरातील अंबानगर परिसरात वास्तव्यास होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते.
प्राथमिक माहितीनुसार, पत्नी कार्यरत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेसंदर्भात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती समोर आली आहे.
लॅपटॉपमध्ये सुसाईड नोट, व्हॉट्सॲप स्टेटसवरही उल्लेख
घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या लॅपटॉपमध्ये एक सविस्तर नोट लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरही आत्महत्येचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.
या नोटमध्ये काही अधिकाऱ्यांकडून झालेल्या कथित मानसिक छळाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेपूर्वी मित्राला केला होता फोन
प्राथमिक माहितीनुसार, गोदावरी नदीत कार झोकून देण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या एका मित्राशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे. या संभाषणाचा तपशीलही तपासाचा भाग आहे.
स्थानिकांच्या मदतीने कार नदीतून बाहेर
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीतून कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
पोलिस तपास सुरू; कारण अद्याप स्पष्ट नाही
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. लॅपटॉपमधील मजकूर, व्हॉट्सॲप स्टेटस, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





