‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : संभाव्यता व आव्हाने’ विषयावरील प्रभावी सादरीकरणाला परीक्षकांची दाद; सनशाईन स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा
कारंजा : पंचायत समिती, कारंजा येथील शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा-२०२६ मध्ये सनशाईन स्कूल, कारंजा येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. हर्षिका हेमराज बन्नगरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
पंचायत समिती कारंजाच्या शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा विद्यालय येथे या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. National Science Seminar-2026 अंतर्गत ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपापली मते व अभ्यासपूर्ण माहिती प्रभावीपणे सादर केली.
या स्पर्धेत हर्षिका बन्नगरे हिने विषयाचा सखोल अभ्यास, मुद्देसूद मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची विशेष दाद मिळवली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिला तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक देण्यात आला.
हर्षिकाच्या या यशामुळे सनशाईन स्कूल, कारंजाच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी पंकजा तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी वीणा धावडे, केंद्रप्रमुख विनोद बारापात्रे, संस्थाध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रेम महिले आणि संस्था सचिव विजय ठाकरे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आई-वडील आणि शिक्षकांना यशाचे श्रेय
आपल्या या यशाबद्दल हर्षिका बन्नगरे हिने आई-वडिलांसह आपल्या सर्व शिक्षक-शिक्षिकांना श्रेय दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळेच आपण ही कामगिरी करू शकलो, अशी भावना तिने व्यक्त केली.
हर्षिकाच्या या यशाबद्दल शाळा, शिक्षकवर्ग, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I परमानंद मुदगल : 📲 9028162217










