कळमेश्वर तालुक्यात डिजिटल खत विक्री व्यवस्थापनावर भर; नोंदी अचूक, पारदर्शक व वेळेवर ठेवण्याचे आवाहन
सतीश पांडे | प्रतिनिधी
कळमेश्वर, दि. २३ सप्टेंबर २०२६ : कळमेश्वर तालुक्यातील खत विक्रेत्यांसाठी FFS App च्या वापराबाबत प्रशिक्षण कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला. तालुक्यातील बहुसंख्य खत विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणात सहभाग घेतला. डिजिटल पद्धतीने खत विक्रीचे व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि वेळेवर करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक यांनी FFS App चा वापर, खत विक्रीच्या नोंदी अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया तसेच खत विक्री व्यवस्थापनामध्ये ॲपचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या निर्देशानुसार डिजिटल पद्धतीने कामकाज करून खत विक्रीच्या नोंदी अचूक व वेळेवर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला कृषी विकास अधिकारी (जि.प. नागपूर) समाधान धुळधुळे, कृषी अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर विठ्ठल थूल आणि गुण नियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रशांत राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कळमेश्वर तालुका कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष मनोज निकम, उपाध्यक्ष नितीन गजभिये आणि तालुका प्रतिनिधी अधिकार राव यांच्यासह प्रशांत बोडखे, आकाश डहाके, किशोर मानकर, निश्चय मुन, विशाल श्रीखंडे, शेखर ठाकरे, नितीन बोराटे, पंकज वाडी, केशव गणोरकर, प्रशांत आवारी, सचिन जैस्वाल, परमार (खरेदी-विक्री संघ), सुधाकर साबळे, प्रशांत चांदुरकर, संदीप डांगोरे आणि देवेंद्र वर्मा उपस्थित होते. याशिवाय कृषी निविष्ठा विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणात उपस्थित खत विक्रेत्यांनी FFS App च्या वापराबाबत विविध शंका उपस्थित केल्या. संबंधित शंकांचे निरसन करून ॲपच्या माध्यमातून खत विक्रीची नोंद अचूक व वेळेवर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर, नोंदी अद्ययावत ठेवणे आणि शासनाच्या ऑनलाइन व्यवस्थापन प्रक्रियेचे पालन याबाबतही माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे खत विक्रेत्यांना FFS App व डिजिटल खत विक्री व्यवस्थापनाची सविस्तर माहिती मिळाली असून, त्याचा प्रभावी वापर केल्याने खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता वाढून शासनाच्या ऑनलाइन व्यवस्थापनाला अधिक गती मिळण्यास मदत होईल, असे उपस्थितांनी सांगितले.






