December 1, 2025 7:02 am

मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना

आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी; जरांगेंचेही स्वत:च्या सहीने पोलिसांना हमीपत्र

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते.

                        या माध्यमातून मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने ही परवानगी नाकारल्याने मोठा वाद झाला होता.
                        मनोज जरांगे यांचा मोर्चा रात्री आठ वाजता शेवगाव शहरात दाखल झाला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मराठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना संबोधित केल्यानंरत मोर्चा शिवनेरीकडे मार्गस्थ झाला.

जरांगेंनी आंदोलनापेक्षा चर्चेतून तोडगा काढूया- मंत्री दादा भुसे

                         मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली असतानाच, राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी त्यांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य करत, भुसे यांनी सणासुदीच्या काळात आंदोलनाऐवजी चर्चेला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.
                         मंत्री भुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त आहेत, याबाबत कोणतीही शंका नाही. परंतु, सध्या मुंबई, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशात गणपती बाप्पांचा उत्सव सुरू आहे. अशा उत्सवाच्या काळात आंदोलनापेक्षा चर्चेतून जर काही समाधानकारक तोडगा काढता आला, तर ते सर्वांसाठी चांगले होईल.
मराठा नेत्यांनी साथ द्यावी : जरांगे
                          मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी किती दिवस सगळं सहन करतील, सत्ताधारी आणि विरोधातील मराठा आमदारांना आवाहन केले आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, आज समाजाला तुमची गरज आहे, समाज तुमच्या सोबत आहे, तुम्ही समाजासोबत राहा, कशालाही घाबरू नका सोबत या साथ द्या

आमदार चित्रा वाघ यांचा मनोज जरांगेंवर पलटवार

काय गबाळे उचकायचे ते उचका, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही! : चित्रा वाघ

                           भाजप नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे यांनी माझे गबाळे उचकण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी काय उचकायचे ते उचकावे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
                           मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे यांच्यावर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हालाही तुमच्याविषयी आदर आहे. तुम्ही एका समाजासाठी आरक्षणाचे काम करत आहात. नक्की करा. हे आरक्षण कुणी देणार असतील तर ते देवेंद्र फडणवीसच देतील.
                           त्यामुळे त्यांच्या आईवर ज्या पद्धतीने टीका करण्यात आली ती टीका महाराष्ट्रात कुणीही खपवून घेणार नाही. आता त्यांनी आपले शब्द मागे घेतलेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. राहिली गोष्ट माझी, तर मला जे खटकले त्यावर मी बोलले. त्यावर नेहमीप्रमाणे ते मलाही बरेचकाही बोलले. मी बाप्पांच्या आगमनाची वाट पाहत होते. त्यामुळे शांत होते. ते जे बोलले ते मी ऐकले. वेळ आल्यानंतर मी त्यालाही योग्य ते उत्तर देईन. मी रोज अनेकांच्या शिव्या ऐकते. आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही.

काय गबाळे उचकायचे त उचका

                         मनोज जरांगे यांनी मला गबाळे उचकण्याचा इशारा दिला. त्यांनी जे उचकायचे ते उचकावे. मी सुद्धा घाबरणारी नाही. माझे नाव चित्रा वाघ आहे. मागील 27 वर्षांपासून मी राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहे. मी आमदार असेन किंवा नसेन. मला जे करायचे ते करेन. मनोज जरांगे यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा. पण कुणाच्याही आई-बहिणींना मध्ये आणू नये. आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलो हे जरांगेंना माहिती नाही. त्यांनी घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली. त्यांनी त्यांना जे करायचे ते करावे. माझे काम मी करत राहणार, असेही चित्रा वाघ यावेळी बोलताना म्हणाल्या.

आत्ता पाहू काय म्हणाले होते मनोज जरांगे?

                        मनोज जरांगे चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाले होते, माझ्यावर आरोप करणाऱ्या चित्रा वाघ आमच्या आई-बहिणींवर पोलिसांनी लाठीमार केला तेव्हा कुठे गेल्या होत्या? तेव्हा त्यांना आमच्या आईचे दुःख दिसले नाही का? तेव्हा ती बाई कुठे गेली होती? कधीपर्यंत सरकारच्या शाळा सांभाळणार? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे मेली होतीस? आमच्या लहान मुली, तीन-चार वर्षांच्या मुली पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाल्या, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, तेव्हा तू झोपा काढत होतीस का? तेव्हा तुझी जात जागी झाली नाही का? तू कुणाच्याही नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. नाहीतर तुझे सगळे घोटाळे बाहेर काढेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News