February 7, 2026 7:09 am

समस्त गवळी विकास संस्थेचे राज्यव्यापी धरणा आंदोलन उत्स्फूर्त
शासनाचे लक्ष वेधणारे निवेदन हिवाळी अधिवेशनात सादर

नागपूर | 08 डिसेंबर 2025 : समस्त गवळी विकास संस्था महाराष्ट्र प्रदेशतर्फे गवळी समाजाच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी एकदिवसीय धरणा आंदोलन भव्यदिव्य उत्साहात पार पडले. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि पशुपालन क्षेत्रातील समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

या धरणा आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष इंजी. अशोक भाले यांनी केले. प्रारंभी प्रास्ताविक करताना प्रदेश सरचिटणीस प्रा. शैलेश हातबुडे यांनी गवळी समाजाचे इतिहासातील योगदान, पशुपालनाधारित जीवनशैली आणि शासन व्यवस्थेत होत असलेली उपेक्षा यावर भाष्य केले.
“समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. आरक्षण, शैक्षणिक सुविधा, पशुधन संवर्धन आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रांमध्ये समप्राप्ती हवी,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

आंदोलनात शासनाकडे सादर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण मागण्यांमध्ये —
मेळघाटातील गवलान व ग्वालवंश जातींचा केंद्राच्या ओबीसी सूचीत समावेश
गाई–म्हशी खरेदीसाठी ९०% अनुदान व बिनव्याजी कर्ज
पशुधन विमा योजना सुरू करणे
धामणगाव गवळी–मिंझरी रस्ता डांबरीकरण
नॉन-क्रीमी लेयरची अट रद्द करणे
भ.ज.ब. प्रवर्गाचे आरक्षण २.५% वरून ५% करणे
सरकारी भरती मंजूर बिंदू-नामावलीनुसारच करणे
गावागावांत गवळी समाजभवन, वसतीगृहे व वाचनालये उभारणे
शेतमालाच्या एमएसपीला कायदेशीर संरक्षण
चराईसाठी कुरणे व बारमाही चारा डेपो उपलब्ध करून देणे
धनगर–गवळी साधर्म्याचा विचार करून सवलतींचा विस्तार करणे
वन्यजीव हल्ल्यात एक कोटी रुपये भरपाई व कुटुंबातील एकास शासकीय नोकरी
पेसा कायदा गवळी समाजावर लागू करण्यासाठी दुरुस्ती
या मागण्यांचा प्रमुख समावेश होता.

शांत, संघटित आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेले हे आंदोलन गवळी समाजाच्या प्रश्नांचे प्रबळ प्रतिनिधित्व करणारे ठरले. समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रभाकर देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन इंजी. मदन साखरकर यांनी मानले. धरणा आंदोलनात मन्नूभाई हिरनवार, सलीम मिरावाले, कृष्णाजी बोपटे, यादवराव लोहंबरे, विजय देशमुख, मनोहर मोरे, दुधराम लोहंबरे, प्रा. मनोहर ठाकरे, रेशीम नाट यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व समाजबंधू उपस्थित होते.

मोठ्या उपस्थितीमुळे आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिवसभर अधिवेशन परिसरात पाहायला मिळाले.

0
0

Leave a Reply

Realted News