कारंजात ईदनिमित्त सर्वधर्मीय एकात्मतेचे दर्शन
नागरी समस्या संघर्ष समितीसह विविध संघटनांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
काटा वृत्तसेवा/ परमानंद मुदगल
कारंजा (घा.) : रमजान महिन्यानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फित्रच्या निमित्ताने कारंजा येथे सर्वधर्मीय एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले. शहरातील मुस्लिम बांधवांनी बंगाली पीरबाबा दर्गाहजवळील ईदगाह परिसरात एकत्र येऊन शांततामय वातावरणात नमाज अदा करून ईदचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीसह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी दर्गाहला भेट देऊन चादर अर्पण केली व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे सामाजिक सौहार्द आणि बंधुभावाचे वातावरण अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
मुस्लिम बांधवांनी या पवित्र दिवशी सामूहिक प्रार्थना करत देशात शांतता, प्रगती आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी विविध समाजघटकांतील नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेत हस्तांदोलन करून बंधुभाव व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व आभार मानण्यात आले.
या वेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बुद्धिस्ट एम्प्लॉय वेल्फेअर असोसिएशन, अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र, गुरुदेव सेवा मंडळ, प्रहार अपंग क्रांती संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, शिवा संघटना, राष्ट्रीय मुस्लिम सेवा संघ आदी संघटनांचे कार्यकर्ते तसेच कारंजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन उपस्थित होते. ईदच्या निमित्ताने कारंजा येथे साजऱ्या झालेल्या या उपक्रमातून सर्वधर्मीय ऐक्य, सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची भावना अधोरेखित झाली.





