का टा वृत्तसेवा | माणिकदास बेलुरकर
विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन
3.89 लाखांचे आकर्षक बक्षीस
वरुड/अमरावती | प्रतिनिधी : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरुदेव आश्रम व विविध समित्यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ एप्रिल २०२६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार असून, एकूण ३ लाख ८९ हजार रुपयांची आकर्षक पारितोषिके स्पर्धकांसाठी ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे आयोजन वरुड येथील अष्टविनायक सभागृह, पोलिस स्टेशन रोड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुष गट, महिला गट आणि बाल गट अशा तीन विभागांचा समावेश असून सर्व वयोगटातील स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक ४१,००० रुपये, द्वितीय ३५,००० रुपये तर तृतीय ३१,००० रुपये असे आकर्षक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. महिला गटासाठी प्रथम २१,००० रुपये, द्वितीय १८,००० रुपये आणि तृतीय १५,००० रुपये तर बाल गटासाठी प्रथम १५,००० रुपये, द्वितीय १२,००० रुपये आणि तृतीय ९,००० रुपये अशी पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय इतर क्रमांकांसाठीही विविध रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आचार्य हरिभाऊ दादा वेरुळकर यांच्या हस्ते होणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि उत्कृष्ट खंजिरी वादक यांनाही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या भव्य स्पर्धेसाठी आयोजक समिती, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य लाभत असून, परिसरातील भजनप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.










