MAHARASHTRA : राज्यात लवकरच शिक्षक भरती

राज्यात लवकरच शिक्षक भरती; ‘पवित्र पोर्टल’द्वारे हजारो पदे भरणार

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो पात्र तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी देओल यांनी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

नवीन नियमानुसार, रोस्टर (बिंदूनामावली) प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी शिक्षण संस्थांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती सादर करण्यापूर्वी ती मागासवर्गीय कक्ष व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतरच ही माहिती ‘पवित्र पोर्टल’वर अपलोड केली जाईल. या पोर्टलद्वारे भरलेल्या पदांनाच शासनाची मान्यता मिळणार असून, भविष्यातील वेतन देखील त्याच पदांसाठी लागू राहील. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, खासगी शाळांमधील क व ड वर्गातील अनुकंपा तत्त्वावरील पदेही तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावांपैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, उर्वरित प्रस्तावांतील त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार आहेत. तसेच, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे करण्यात येणार आहे.

याशिवाय, जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे, त्या ठिकाणी दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतही शासन सकारात्मक असून, यासंदर्भातील निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नव्या प्रणालीमुळे पात्र उमेदवारांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News