भोंदू खरात भक्तांवर कारवाई व्हायलाच हवी : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी भोंदू बाबांवर आणि त्यांच्या भक्तांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत राज्यातील अंधश्रद्धेविरोधात तीव्र भूमिका मांडली. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही काही लोक भोंदूंच्या प्रभावाखाली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
शिवसेना भवन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित एक्स्पोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक भूमिपुत्रांना कस्टम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राला आधुनिक राज्य म्हणवून घ्यायचे असेल, तर भोंदूगिरीविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. कायद्याचे पालन करणारेच जर अशा भोंदू बाबांच्या मागे लागले, तर त्यांच्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे.”

लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीवर भर देताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. “आम्ही राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, तर काही जण अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी सर्व संबंधितांची चौकशी करण्याची मागणी केली. “पाणी कुठपर्यंत मुरले आहे, हे जनतेसमोर यावे. कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी अशा भोंदू बाबांवर कारवाई झालीच पाहिजे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. पाच आठवड्यांच्या या लॉजिस्टिक्स कोर्सअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0