नागपूर विधान परिषद निवडणूक :
डॉ. राजीव पोतदार यांना भाजप-महायुतीची उमेदवारी जाहीर
का टा वृत्तसेवा | नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप-महायुतीने ज्येष्ठ समाजसेवक व पक्षनिष्ठ कार्यकर्ते डॉ. राजीव पोतदार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची घोषणा होताच भाजप तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातून डॉ. पोतदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. राजीव पोतदार हे उद्या भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली असून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.
भाजपाचे जिल्हा महामंत्री ईमेश्वर यावलकर यांनी नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार उद्या सकाळी ९ वाजता नागपूर येथील संविधान चौकात सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. पोतदार यांच्या उमेदवारीमुळे भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीची ताकद आणखी बळकट होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारी घोषणेनंतर नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.










