LPG : घरगुती एलपीजी सिलेंडर ₹ 29 ने महाग

घरगुती एलपीजी सिलेंडर ₹29 ने महाग; तीन महिन्यांत ₹89 ची वाढ

PTI I का टा वृत्तसेवा

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला असून घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात ₹29 ची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर रविवार मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो वजनाचा घरगुती गॅस सिलेंडर ₹913 वरून ₹942 झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी सिलेंडरच्या दरात ₹60 ची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मार्चपासून आतापर्यंत घरगुती गॅस सिलेंडर एकूण ₹89 ने महागला आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या ऊर्जा खर्चामुळे आणि घरगुती एलपीजी विक्रीवरील तोट्यामुळे दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. कंपन्यांचा दावा आहे की प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे सुमारे ₹703 चा तोटा सहन करावा लागत होता. नव्या दरवाढीनंतरही या तोट्याची केवळ अंशतः भरपाई होणार आहे.

यापूर्वी 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ₹50 ची वाढ करण्यात आली होती. तसेच 1 मार्च 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही ₹31 पर्यंत वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ₹11 ची वाढ करण्यात आली असून त्याची किंमत आता ₹821.50 झाली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीही महाग

एलपीजीप्रमाणेच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरातही अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकूण ₹7.50 प्रति लिटरने वाढल्या आहेत, तर सीएनजी सुमारे ₹6 प्रति किलोने महाग झाली आहे.

तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोलवर सुमारे ₹11 प्रति लिटर आणि डिझेलवर ₹33.60 प्रति लिटर इतका तोटा होत आहे. सरकारने मात्र जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील संपूर्ण वाढ ग्राहकांवर टाकलेली नसून त्यातील काही भार सरकारी तेल कंपन्या स्वतः उचलत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News