NEET पेपरफुटी प्रकरण
RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर CBIच्या जाळ्यात; 9 दिवसांची कोठडी

परीक्षेच्या 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप; देशव्यापी रॅकेटचे धागेदोरे उघड
लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणातील तपास अधिक गतीने पुढे जात असून आता लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. विशेष CBI न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील देशव्यापी रॅकेटचे अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत.
या प्रकरणात यापूर्वी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली होती. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
CBIने गेल्या आठवड्यात मोटेगावकर यांच्या विविध क्लासेसवर छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आले. तपासात मोटेगावकर हे पेपरफुटी करणाऱ्या टोळीतील सक्रिय सदस्य असल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
परीक्षेच्या 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी होणाऱ्या NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांना तब्बल 10 दिवस आधी, म्हणजेच 23 एप्रिललाच मिळाली होती. त्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचा डेटा आढळल्याचे समोर आले आहे.
CBIच्या प्राथमिक चौकशीनुसार, मोटेगावकर यांनी विवेक पाटील नावाच्या व्यक्तीसह काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठवली होती. मात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे समजते. तपास दिशाभूल करण्यासाठी त्यांनी डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, तपास यंत्रणांनी तो डेटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असल्याची माहिती आहे.
पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधांची चौकशी
या प्रकरणात अटक करण्यात आलेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पथकात असल्याचा आरोप आहे. त्यांनी काही काळ RCC क्लासेसमध्ये अध्यापनही केले होते. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यातील संबंधांची सखोल चौकशी सुरू असून, दोघांमधील कथित समन्वयामुळे तपास अधिक गंभीर बनला आहे.
NTA अधिकाऱ्यांवरही संशय
CBIच्या तपासात NTAमधील एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या नेटवर्ककडे वळला आहे. अनेक नामांकित क्लासेस चालकही तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे समोर येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीजची घोषणा
दरम्यान, NEET परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा झाल्यानंतर शिवराज मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांसाठी RCCची ‘टॉप टेस्ट सिरीज’ आणि ‘वन शॉट’ व्हिडिओ मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, ही योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच CBIने त्यांच्यावर कारवाई केली.









