डिजेवर नृत्य केल्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या

डिजेवर नृत्य केल्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या

पतीचीही आत्महत्या, तीन चिमुकले पोरके

नांदेड : मेव्हण्याच्या लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची आणि त्यानंतर स्वतः झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे उघडकीस आली आहे. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली असून तीन लहान मुले आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल विनोद राठोड (वय 35) आणि विनोद रंगराव राठोड (वय 40, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) हे आपल्या तीन मुलांसह मेव्हण्याच्या लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. लग्न समारंभादरम्यान पायल यांनी डिजेवर नृत्य केल्याने विनोद संतापला होता. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता.

लग्नानंतर पायल या पती व मुलांसह माहेरीच थांबल्या होत्या. मंगळवारी पहाटे सुमारे 3 वाजताच्या दरम्यान विनोदने धारदार चाकूने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर गावाच्या शिवारातील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

सकाळी घरातील सदस्यांना पायल रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. त्याचवेळी ग्रामस्थांना शिवारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत विनोदचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेत दाम्पत्याच्या एक मुलगा व दोन मुली अशा तीन निष्पाप लेकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैजंने, पोलिस निरीक्षक अमोल भगत यांच्यासह पोलिस पथकाने भेट देत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

0
0

Leave a Reply

Realted News