December 1, 2025 5:41 am

OBC नेत्यांचा मराठा आरक्षणाला कडाडून विरोध

उद्यापासून राज्यभरात जनजागृती मोहीम; 15 दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेटवले आहे. त्यात आता ओबीसी नेत्यांनीही उद्यापासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवून 15 दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ठिणगी पडून वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
                        मनोज जरांगे पाटील उद्यापासून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. त्याला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपुरात एक महत्वपूर्ण बैठक झाली. महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात आला.

नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण : 15 दिवसांत मुंबई गाठणार

                         बबनराव तायवाडे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे. आजच्या बैठकीत उद्यापासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पत्रकार परिषद घेऊनही ओबीसी समाजाची भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल. इतरही जिल्ह्यांत स्थानिक पदाधिकारी उपोष करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर पुढील 15 दिवसांत आम्ही मुंबईच्या दिशेने प्रयान करण्याचा प्रयत्न असेल.
                         सरकारने आम्हाला ओबीसी आरक्षणाला हात न लावण्याची हमी दिली आहे. त्यावर सरकारने ठाम रहावे. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले जाते, त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन आमच्या समाजाचे आरक्षण कमी करू नये. विशेषतः मराठा समाजातील नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, असे तायवाडे म्हणाले.

मराठा तेवढाच मेळवावा, ओबीसी मुळासकट संपवावा

                        दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची केलेली मागणी बेकायदा असल्याचा दावा केला आहे. मनोज जरांगेंची मागणी बेकायदा आहे. सरकारने त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात अराजक निर्माण होऊ शकते. मराठा तेवढाच मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा असा जरांगेंच्या मागणीचा अर्थ होतो. ओबीसी आंदोलनाविरोधात प्रतिआंदोलन पुकारतील. त्यांची संख्या जेवढी आहे, त्याच्या 10 पटीने ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला दिसेल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News