३१ वर्षांची ज्ञानसेवा, समाजकार्याचा समृद्ध वारसा! माणिकदास बेलूरकर यांचा भव्य सेवापूर्ती सोहळा

३१ वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान! माणिकदास बेलूरकर यांचा सपत्नीक सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांतही मोलाचे योगदान; मान्यवरांकडून कार्याचा गौरव

वरूड  : जागृत नवयुवक शिक्षण संस्था, वरूड अंतर्गत संचालित पी. व्ही. साबळे जागृत विद्यालय, सुरळी तसेच माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, वरूड येथील सहायक शिक्षक माणिकदास बेलूरकर यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्तीनिमित्त आयोजित सपत्नीक सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यशोदाई सभागृह, वरूड येथे आयोजित या सोहळ्यात अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक, राष्ट्रधर्म प्रचार समितीचे सचिव तथा माजी मुख्याध्यापक रामदास चोरोडे आणि विदर्भ साहित्य संघ व शारदा भगिनी मंडळ, वरूडच्या अध्यक्षा रेखा सुरेश आजनकर यांच्या हस्ते बेलूरकर दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

माणिकदास बेलूरकर यांनी आपल्या ३१ वर्षांच्या शिक्षक सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी मोलाचे योगदान दिले. केवळ अध्यापनापुरते कार्य मर्यादित न ठेवता त्यांनी वरूड तालुक्यात श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध रचनात्मक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले. ग्रंथालय वाचक चळवळ, बाल सुसंस्कार शिबिरे, व्यायामशाळा, युवक शिबिरे आणि ग्रामजयंती अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांनी केला.

कार्यक्रमात जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य तथा विश्वस्त एस. एन. बेलसरे, संस्थेचे सहसचिव प्रा. अरुण वानखेडे, डिफेन्स स्कूल ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूरचे माजी प्राचार्य शरद तिनखेडे, माजी लेखा व वित्त अधिकारी भा. रा. बेलूरकर, माया नांदूरकर, सविता बेलूरकर आणि डॉ. कार्तिक बेलूरकर यांनी मनोगत व्यक्त करून बेलूरकर यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी सेवाग्राम आश्रमाचे गजानन आंबुलकर, राष्ट्रीय नकलाकार हरिभाऊजी बेलूरकर, सामाजिक कार्यकर्ते उद्धव साबळे, विदर्भ माध्यमिक संघटनेचे संघटक श्रावण बरडेसर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बुरंगे यांनी केले. पत्रकार, लेखक तथा मुख्याध्यापक अजय देशपांडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडत उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुरेंद्रकुमार यांनी आभार प्रदर्शन केले.

या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या यशस्वितेसाठी निमंत्रक डॉ. कार्तिक बेलूरकर, प्रशांत नागमोते, मनीष कुबडे, नितीन सिनकर, सुभाष राऊत, मोहन साबळे, जगदीश गुल्हाने, अनुराग धानोरकर, तन्वी जांभूळकर, राजू सैनी, गजानन राजनकर, महेंद्र तळखंडकर, पत्रकार तथा नगरसेवक प्रवीण सावरकर, नगरसेवक गौरव इंगळे, उद्धव भड आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज कॉलनीतील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

३१ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाची सांगता करताना समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या माणिकदास बेलूरकर यांचा हा सेवापूर्ती सोहळा उपस्थितांसाठी कृतज्ञता आणि प्रेरणेचा अविस्मरणीय क्षण ठरला.

0
0

Leave a Reply

Realted News