खोदलेला रस्ता, उघडी नाली अन् अस्ताव्यस्त साहित्य
दोन स्टारबस नालीत कलंडल्या, थोडक्यात मोठा अनर्थ टळला; ज्येष्ठ नागरिकांची जीवघेणी कसरत
का टा वृत्तसेवा | सतीश पांडे
कळमेश्वर : शहरातील विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे काय? असा संतप्त सवाल बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील नाली बांधकामाच्या परिस्थितीवरून उपस्थित होत आहे. नाली बांधण्यासाठी खोदून ठेवलेला रस्ता, ठिकठिकाणी विखुरलेले दगड-माती, अस्ताव्यस्त पाइप आणि बांधकाम साहित्य यामुळे या मार्गावरून ये-जा करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना बँकेत प्रवेश करताना व बाहेर पडताना अक्षरशः जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे.
दोन स्टारबस नालीत कलंडल्या; मोठा अपघात थोडक्यात टळला!
या बांधकाम परिसरातील धोकादायक परिस्थितीचा अंदाज यावरूनच येतो की, रस्त्यावरून जाणाऱ्या दोन स्टारबस खोदलेल्या नालीत कलंडल्याची घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेने बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत जाणेही बनले आव्हान!
बँक ऑफ इंडियामध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक आर्थिक व्यवहारांसाठी येतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या लक्षणीय असते. मात्र, बँकेसमोरील रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना तात्पुरत्या लोखंडी रॅम्पचा आधार घ्यावा लागत आहे. रॅम्पच्या आजूबाजूला असलेले दगड, माती आणि असमतल पृष्ठभाग यामुळे पाय घसरण्याची तसेच तोल जाऊन पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
केवळ बँकेसमोरील परिसरच नव्हे, तर संपूर्ण रस्त्यावर अशीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे. या बांधकामाचा फटका यापूर्वीही अनेक नागरिकांना बसला असून, अपघातांमध्ये काही जण गंभीर जखमी झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
बांधकाम सुरू आहे, मग सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
नाली बांधकाम हे शहराच्या विकासासाठी आवश्यक असले, तरी विकासकामांच्या नावाखाली नागरिकांचे जीव धोक्यात घालणे कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षित पर्यायी मार्ग, मजबूत रॅम्प, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पायवाट, धोक्याचे फलक आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे.
मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या मूलभूत सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या अडचण असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने होणे आवश्यक आहे.
अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. नाली बांधकाम परिसरातील अस्ताव्यस्त साहित्य हटवून रस्त्याची सुरक्षित व्यवस्था करावी, बँकेत येणाऱ्या नागरिकांसाठी मजबूत व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि संपूर्ण बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विकासकामे नागरिकांच्या सोयीसाठी असतात, त्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी नव्हेत! दोन स्टारबस नालीत कलंडल्यानंतरही संबंधित यंत्रणा गंभीर दखल घेणार नसेल, तर आणखी किती अपघातांची प्रतीक्षा केली जात आहे? मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून
सतीश पांडे : 📲 9561480227






