टेकाडीच्या वार्षिक मंडईत सांस्कृतिक कलाविष्कारांची धमाल!
कीर्तनातून समाजप्रबोधन, दंडार-तमाशाने लोककलेचा जागर; कोल्हापुरी लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध
का टा वृत्तसेवा | किशोर वासाडे
टेकाडी (को.ख.) : दीपावलीच्या उत्साहाला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड देत टेकाडी येथील वार्षिक मंडई उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. परम सेवा संघ, टेकाडी आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्यात कीर्तन, पारंपरिक दंडार, दुय्यम तमाशा आणि कोल्हापुरी लावणी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. भक्ती, मनोरंजन आणि लोकसंस्कृतीच्या संगमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि व्यसनमुक्तीचा संदेश
गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता बुलढाणा येथील कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे ‘आई माझी मायेचा सागर’ या विषयावर कीर्तन पार पडले. आपल्या प्रभावी निरूपणातून त्यांनी भक्ती, संस्कार आणि जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच समाजातील अनिष्ट प्रथा, वाईट प्रवृत्ती आणि व्यसनाधीनतेवर परखड भाष्य करत व्यसनमुक्ती, आरोग्य आणि आध्यात्मिक जीवनाचा संदेश दिला.
याच दिवशी टेकाडी येथील नागरिक नरेंद्र तुकाराम बुधे यांचे दुःखद निधन झाल्याने कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
दंडारच्या माध्यमातून पारंपरिक लोककलेचा जागर
बाराभाई दंडार मंडळ आणि हनुमान दंडार कलापथक मंडळ यांच्या वतीने पारंपरिक दंडार सादर करण्यात आली. या कलाविष्काराने जुन्या लोकपरंपरेला उजाळा मिळाला. दूरचित्रवाणी, मोबाईल आणि आधुनिक मनोरंजनाची साधने उपलब्ध नसलेल्या काळात दंडारसारख्या लोककलांनी अनेक दशकांपासून समाजाचे मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधनाचेही कार्य केले आहे.
आधुनिक मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावातही कलाकारांनी जपलेली ही सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याची भावना या सादरीकरणातून अधोरेखित झाली.
दुय्यम तमाशाने मंडईत आणली रंगत
शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर चौक आणि महाजननगर, टेकाडी येथे दुय्यम तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी सादर झालेल्या तमाशाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पारंपरिक लोककलेच्या या सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोल्हापुरी लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध
शुक्रवारी रात्री ८ वाजता परम सेवा संघ आणि गावकरी मंडळी यांच्या वतीने रॉयल आर.एस. प्रस्तुत नागपूर येथील महाराष्ट्राची प्रसिद्ध कोल्हापुरी लावणी डान्स ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लावणीच्या ठसकेबाज अदाकारीने आणि आकर्षक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. उपस्थित रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
धार्मिक परंपरेसोबत सांस्कृतिक वारशाचे जतन
दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक पर्वामुळे टेकाडीच्या वार्षिक मंडई उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली. कीर्तनातून समाजप्रबोधन, दंडार आणि तमाशातून पारंपरिक लोककलेचे दर्शन, तर लावणीतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती अशा विविधांगी कार्यक्रमांनी मंडई उत्सव संस्मरणीय ठरला.
या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन परम सेवा संघ, टेकाडी (को.ख.) आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून
किशोर वासाडे : 📲 9423403810






