मोहप्यात गॅसटंचाईमुळे नागरिकांचा संताप

मोहप्यात गॅसटंचाईमुळे नागरिकांचा संताप

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सिलिंडर वाटप

काटा वृत्तसेवा : भूषण सवाईकर

मोहपा : घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी मोहप्यातील गॅस वितरण केंद्रावर धडक देत संताप व्यक्त केला. सकाळी सुमारे १० वाजता ९० सिलिंडर घेऊन आलेल्या वाहनानंतर वितरण केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे ग्राहकांना सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल सहा तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर कळमेश्वर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सिलिंडरचे सुरळीत वाटप करण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसांपासून गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कळमेश्वर येथील अशोक गॅस एजन्सीशी संबंधित ग्राहकांनी रिफिलिंगसाठी नोंदणी केली होती. मात्र, अनेकांना अद्यापही सिलिंडर मिळालेले नाहीत. काही ग्राहकांना मोबाईलवर सिलिंडर वितरित झाल्याचे संदेश मिळाले, परंतु प्रत्यक्षात वितरण न झाल्याने नागरिकांचा रोष वाढला.

दरम्यान, संबंधित गॅस वितरण केंद्राचे शटर गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांनी सुरुवातीला एजन्सीकडे धाव घेतली. मात्र, तेथे कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी केंद्रावर गर्दी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला.

गॅसटंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढावा व नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

0
0

Leave a Reply

Realted News