१२० विद्यार्थी, ६ शिक्षकांसह १५० जणांचा सहभाग; घोषणांमधून दिला सुरक्षित व व्यसनमुक्त समाजाचा संदेश
सतीश पांडे | प्रतिनिधी
कळमेश्वर : वाहतूक नियमांचे पालन, रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून युवकांना दूर ठेवण्यासाठी कळमेश्वर पोलिसांच्या वतीने गुरुवारी (दि. १७) शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत विविध शाळा व महाविद्यालयांतील १२० विद्यार्थी, ६ शिक्षक तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सुमारे १५० जणांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या जनजागृती रॅलीत नगर परिषद शाळा, प्रताप माध्यमिक शाळा, नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तसेच गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोलिस स्टेशन कळमेश्वर येथून रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीने बस स्टॉप, जोड मारोती चौक, बाजार चौक, अंडा चौक आणि तळ्याची पार या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. त्यानंतर रॅली पुन्हा पोलीस स्टेशन परिसरात पोहोचली.
‘हेल्मेट वापरा, जीव वाचवा’चा संदेश
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘हेल्मेट वापरा – जीव वाचवा’, ‘वाहतूक नियमांचे पालन करा’, ‘अमली पदार्थांना नकार द्या’ अशा घोषणांद्वारे रस्ते सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम टाळावेत आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
या उपक्रमात पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत नारमोड, पोलीस उपनिरीक्षक घोडाम, पोलीस उपनिरीक्षक मन्नान नौरंगाबादे, पोलीस हवालदार रविंद्र बांबल, चेतन राऊत, तसेच पोलीस शिपाई सुखदेव धुळधुळे, योगेश तितरमारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
सुरक्षित वाहतूक आणि व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार
कळमेश्वर पोलिसांच्या या उपक्रमातून वाहतूक शिस्त, रस्ते सुरक्षा आणि अमली पदार्थांविरोधातील जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थी आणि पोलिसांच्या सहभागामुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागर निर्माण करण्यास मदत झाली.
हे सुद्धा वाचा….. ‘जयंती २’ म्हणजे केवळ चित्रपट नव्हे, सामाजिक वास्तवाचा आरसा!












