🚨 ब्रेकिंग : गरीबांच्या ताटातील धान्यावर दलालांचा डल्ला!
‘तांदूळ द्या, ज्वारी घ्या’ फंड्याने चाकूरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार
पुरवठा विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
चाकूर (जि. लातूर) | कामगार टाइम्स प्रतिनिधी
कोरोना काळात गरिबांच्या अन्नसुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला चाकूर तालुक्यात अक्षरशः हरताळ फासला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाकडून मोफत मिळणाऱ्या गहू-तांदळाचा सर्रास काळाबाजार होत असून, या रॅकेटमध्ये दलाल, काही लाभार्थी आणि काही रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे पुरवठा विभागाने सोयीस्करपणे डोळेझाक केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
‘तांदूळ द्या, ज्वारी घ्या’… गावोगावी सुरू अनोखा व्यवहार
लाभार्थींना दोन ते तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळत असल्याने साठवणुकीची अडचण निर्माण होते. याच परिस्थितीचा फायदा घेत काही नागरिक १५ ते २० रुपये किलो दराने तांदूळ विकत आहेत, तर काही ठिकाणी ‘दोन किलो तांदळाच्या बदल्यात एक किलो ज्वारी’ असा व्यवहार खुलेआम सुरू असल्याचे समोर आले आहे.
दलालांची गावोगावी मोहीम; शहरात गोदामे भरत असल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, दलाल मोठी वाहने घेऊन गावोगावी फिरतात. लाभार्थी व काही रेशन दुकानदारांकडून धान्य गोळा करून ते चाकूर शहरातील गोदामांमध्ये साठवले जाते. त्यानंतर रेशनचे मूळ बारदान बदलून हे धान्य लातूरसह इतर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा आरोप आहे.
रेशन दुकानदारांवरही संशयाची सुई
काही ठिकाणी लाभार्थींना धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे त्याच धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे काही रेशन दुकानदारांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
योजनेचा मूळ उद्देशच धुळीस
गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने मोफत धान्य योजना सुरू केली होती. मात्र, चाकूर तालुक्यात हेच धान्य व्यापारी आणि दलालांच्या हातात जात असल्याने योजनेचा मूळ हेतूच हरवला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अधिकाऱ्यांची उडवाउडवीची भूमिका
या प्रकरणाबाबत पुरवठा निरीक्षक अफसाना मुल्ला शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “याबाबत तहसीलदार यांच्याशी बोला, मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही,” असे सांगितले. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.







