महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि भ्रष्टाचारावरून सरकारवर जोरदार निशाणा

भाजपने देश लुटून उद्योगपतींच्या घशात घातला; देश गहाण ठेवण्याचे महापाप सरकारने केले : विजय वडेट्टीवार

ब्रह्मपुरीत काँग्रेसचा विराट जनआक्रोश महामोर्चा

 

ब्रह्मपुरी | प्रतिनिधी : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कथित जनविरोधी, शेतकरीविरोधी आणि युवकविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसच्या वतीने ब्रह्मपुरी येथे विराट जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी शहरातील वातावरण दणाणून गेले.

‘सत्तेचा वापर मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी’

मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी न करता मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाची संपत्ती विकणे, सार्वजनिक उद्योग कमकुवत करणे आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा दावा करत, “संपूर्ण देशाला लुटून देश गहाण ठेवण्याचे महापाप भाजप सरकारने केले,” असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार
मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार

महागाई, बेरोजगारीवर सरकारला घेरले

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून बेरोजगारीमुळे युवकांचे भविष्य अंधारात गेले आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून महिलांच्या सुरक्षेचे प्रश्नही गंभीर झाले आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

सरकारच्या धोरणांमुळे समाजातील प्रत्येक घटक त्रस्त असल्याचे सांगत त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्याचा आणि कर्जमाफीची घोषणा प्रभावीपणे राबवली नसल्याचा आरोप केला.

‘40 टक्के कमिशनशिवाय काम होत नाही’

राज्यातील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार वाढला असून “40 टक्के कमिशनशिवाय काम होत नाही,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचाही उल्लेख केला.

काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री असताना गोसेखुर्द प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आणि त्यामुळे या भागातील सिंचनाला चालना मिळाली, असा दावा त्यांनी केला. मात्र सध्या प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे ते म्हणाले.

समृद्धी महामार्गासाठी शेती संपादनाचा आरोप

समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुपीक शेती कमी मोबदल्यात संपादित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान सहन केले जाणार नाही. “शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शाळा बंद करण्याच्या निर्णयावरही टीका

राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देताना दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची आर्थिक लूट सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘जनता सरकारला धडा शिकवेल’

देशभरातील युवकांनी सरकारविरोधातील संताप जंतर-मंतरवर व्यक्त केला असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी या घटनेचा निषेध केला. जनविरोधी धोरणांविरोधात जनता आता सरकारला धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

युवक काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनीही सरकारच्या कथित दडपशाहीच्या धोरणांवर टीका करत अन्यायाविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले.

तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन

मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. वाढती महागाई आटोक्यात आणणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना हमीभाव व न्याय देणे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करणे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

या महामोर्चामुळे ब्रह्मपुरीतील राजकीय वातावरण तापले असून सरकारच्या धोरणांविरोधातील काँग्रेसचा आक्रमक पवित्रा या माध्यमातून दिसून आला.

मोर्चाला कोण कोण उपस्थित?

यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉ. नितीन उराडे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

 

0
0

Leave a Reply

Realted News