🚨 कळमेश्वर तालुक्यात अपघातांचे थैमान; अवघ्या ९ महिन्यांत रस्ते अपघातांचा अर्धशतकाचा टप्पा!
आजच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; २५ हून अधिक बळी, ४० पेक्षा जास्त जखमींचा दावा — अपघातांची मालिका रोखणार कोण?
का टा वृत्तसेवा
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली असून, आज झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने या गंभीर प्रश्नाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. एका बाजूला तरुणांच्या निष्पाप जीवांचा अपघातांमध्ये बळी जात असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या कुटुंबीयांवर आयुष्यभराची वेदना ओढवते आहे. मात्र, या अपघातांमागील नेमकी कारणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत ठोस पावले कधी उचलली जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कळमेश्वर पोलीस ठाण्यात २८ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झालेल्या FIR क्रमांक 0944/2026 नुसार, काटोल रोड परिसरातील एका अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281 व 106(1) तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम 184 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, फेटरी गुडाऊन परिसरातील माहूर–झरी रोडवर आज भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन १८ वर्षीय युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात वेद विनय बोबडे (वय १८, रा. वीर चक्र कॉलनी, काटोल रोड, नागपूर शहर) आणि अथर्व अजय ठवरे (वय १८, रा. सदर, नागपूर) यांचा मृत्यू झाला. TVS Jupiter क्रमांक MH 31 FJ 1505 वरून माहूर–झरीच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात PSI प्रवीण घोडाम,पोलीस अमलदार अमोल परळकर व राम नेहारे यांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली.
९ महिन्यांत रस्ते अपघातांचे अर्धशतक?
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या सुमारे नऊ महिन्यांत कळमेश्वर तालुक्यात रस्ते अपघातांच्या घटनांनी अर्धशतकाचा टप्पा गाठल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २५ च्या आसपास, तर अपघातात जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करणाऱ्यांची संख्या ४० हून अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात ३० पेक्षा अधिक तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
किरकोळ अपघातांची नोंदच होत नसल्याची चर्चा
गंभीर अपघातांची पोलीस ठाण्यात नोंद होते; मात्र किरकोळ अपघातांच्या अनेक घटना पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचतच नसल्याची चर्चा आहे. वाहनांची कागदपत्रे नसणे, परवाना नसणे किंवा परस्पर तडजोड करून प्रकरण मिटवणे, अशा कारणांमुळे काही घटना अधिकृत नोंदीबाहेर राहत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर समोर येते. त्यामुळे प्रत्यक्ष अपघातांची संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाती मृत्यूंसह इतर अनैसर्गिक मृत्यूंचीही वाढती नोंद
कळमेश्वर पोलीस ठाण्यात विविध कारणांनी होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूंच्या घटनांचीही नोंद होत आहे. उपलब्ध माहितीनुसार अशा प्रकरणांची संख्या मोठी असून, त्यामुळे तालुक्यातील एकूण अनैसर्गिक मृत्यूंच्या घटनांबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते अपघात, पाण्यात बुडणे, रेल्वे दुर्घटना तसेच आत्महत्यांसारख्या घटनांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे.

सोशल मीडियावरील मृत्यूंच्या छायाचित्रांवर नियंत्रणाची गरज
या संपूर्ण परिस्थितीतील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे अपघात अथवा अनैसर्गिक मृत्यूंची अत्यंत संवेदनशील छायाचित्रे सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे प्रसारित केली जात असल्याची तक्रार आहे. अशा छायाचित्रांमुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावू शकतात. त्याचबरोबर लहान मुले, महिला आणि संवेदनशील मनाच्या व्यक्तींवर त्याचा मानसिक परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे मृतदेह किंवा अपघातातील विदारक दृश्यांचे छायाचित्रण व प्रसारण करताना माध्यमे, सोशल मीडिया वापरकर्ते आणि संबंधितांनी अधिक संवेदनशीलता बाळगण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अपघात रोखण्यासाठी आता ठोस उपाययोजनांची गरज
कळमेश्वर तालुक्यातील अपघातांची वाढती मालिका लक्षात घेता धोकादायक रस्ते व अपघातप्रवण ठिकाणांची ओळख, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, वाहनांची कागदपत्रे व चालक परवान्यांची तपासणी, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई आणि वाहतूक जनजागृती याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आज दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा तोच प्रश्न समोर आला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
भूषण सवाईकर : 📲 97645 07440
संजय श्रीखंडे : 📲 9579867431







