राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी हजारो भाविकांची उपस्थिती

मोझरीत गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

सामुदायिक ध्यान, अभिषेक, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ

मोझरी, ता. मोर्शी (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र कर्मभूमी गुरुकुंज-मोझरी येथील महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो गुरुदेवप्रेमींनी महोत्सवात सहभाग घेत राष्ट्रसंतांना भावपूर्ण अभिवादन केले.

पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर विधिवत अभिषेक करण्यात आला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजलेल्या महासमाधी परिसरात शंखनाद, राळ-उदाचा सुगंध आणि भक्तिमय भजनांनी संपूर्ण वातावरण अध्यात्ममय झाले होते.

सामुदायिक ध्यानानंतर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आश्रमाच्या महाद्वारावर नवी भगवी पताका मोठ्या उत्साहात फडकविण्यात आली. यावेळी गुरुतत्त्वाशी नाते दृढ करून समाजहित, राष्ट्रहित आणि मानवतेच्या सेवेसाठी प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.

सामुदायिक ध्यानातून गुरुतत्त्वाचे महत्त्व विशद

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील यांच्या हस्ते महापूजन व सामुदायिक ध्यान कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सामुदायिक ध्यानाचे महत्त्व आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले.

दुपारी आयोजित प्रवचन सत्रात योगेश गावंडे यांनी ‘गुरुमहात्म’ या विषयावर प्रभावी निरूपण करत गुरूंच्या मार्गदर्शनाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

खंजरी भजनांनी भारावले वातावरण

दिवसभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेल्या खंजरी भजनांचे सादरीकरण करण्यात आले. गुरुदेवप्रेमींनी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा देत संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजन समिती, स्वयंसेवक आणि सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

महाप्रसादानंतर सामुदायिक प्रार्थनेने गुरुपौर्णिमा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सव गुरुकुंज-मोझरी : ठळक मुद्दे

  • ▶️ पहाटे ४ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक
  • ▶️ ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना व सामुदायिक ध्यान
  • ▶️ आश्रमाच्या महाद्वारावर नवी भगवी पताका फडकविण्यात आली
  • ▶️ ‘गुरुमहात्म’ विषयावर योगेश गावंडे यांचे प्रवचन
  • ▶️ राष्ट्रसंतांच्या खंजरी भजनांनी भक्तिमय वातावरण
  • ▶️ हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
  • ▶️ सामुदायिक प्रार्थनेने महोत्सवाची सांगता

0
0

Leave a Reply

Realted News