‘विदर्भाची पंढरी’ धापेवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिसागर उसळला

‘विदर्भाची पंढरी’ धापेवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिसागर उसळला

सातदिवसीय यात्रोत्सवाला प्रारंभ

स्वयंभू श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

कामगार टाइम्स | भूषण सवाईकर/ संजय श्रीखंडे

कळमेश्वर : विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वयंभू श्रीविठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या सातदिवसीय वार्षिक यात्रोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून, संपूर्ण मंदिर परिसर ‘विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल’ या जयघोषाने दुमदुमून गेला.

यात्रोत्सवाच्या शुभारंभी आमदार डॉ. राजीव पोतदार, वर्षा पोतदार तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणी भगवंताचे विधिवत सपत्नीक पूजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट, तहसीलदार विकास बिक्कड, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह पवार, सरपंच मंगला शेटे, सुहास ओचावार, प्रिया मानकर, विलास वैद्य, अरुण चिखले, दिलीप धोटे, राजेश शेटे, ईमेश्वर यावलकर, मंगेश चोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

पहाटेपासून दर्शनासाठी रांगा

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचा उत्साह अधिकच वाढला आणि दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी कायम होती.

भाविकांसाठी चोख सुविधा

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान समितीने अल्पोपाहार, पिण्याचे पाणी तसेच अन्य मूलभूत सुविधांची उत्तम व्यवस्था केली होती. देवस्थान समिती, विश्वरूहानी मानव केंद्र आणि स्थानिक स्वयंसेवकांनी सेवाभावी वृत्तीने यात्रेचे व्यवस्थापन सांभाळले.

कडक पोलिस बंदोबस्त

यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सावनेर व कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे यात्रोत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडत आहे.

सुयोग्य नियोजनामुळे भाविक समाधानी

यंदा वाढत्या गर्दीचा विचार करून दुकानांसाठी स्वतंत्र मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी झाली नाही आणि दर्शनाची रांग सुरळीत राहिली. देवस्थान समितीच्या नियोजनाचे भाविकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.

यात्रोत्सवाची वैशिष्ट्ये

  • आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांची उपस्थिती
  • सात दिवस चालणारा वार्षिक यात्रोत्सव
  • श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे विधिवत पूजन
  • भाविकांसाठी पाणी, अल्पोपाहार व मूलभूत सुविधा
  • चोख पोलिस बंदोबस्त आणि सुटसुटीत व्यवस्थापन                                                                                               
0
0

Leave a Reply

Realted News