शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन फसवे, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

उद्धव सेनेचा राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसह अनेक आश्वासने दिली होती. मात्र या घोषणांची पूर्तता न झाल्याने उद्धव सेना आक्रमक झाली आहे.

                          दानवे यांनी म्हटले की, महायुतीच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही लाभ मिळालेला नाही. गेल्या सात महिन्यांत राज्यात 1000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी कर्ज भरण्यास सांगितले.

सरकारने जीएसटी अनुदान शेतकऱ्यांना परत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी करण्यासाठी परदेशातून आयात सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 12 हजारांवरून 15 हजार रुपये करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही.

                        मोदी सरकारने हमीभावाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस आणि सोयाबीन विकावे लागले आहे. दानवे यांनी या सर्व मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.



0
0

Leave a Reply

Realted News