उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, लोकसभेत शिंदे गटाचे संख्याबळ 13 वर

बंडखोर 6 खासदारांच्या गटाचे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण

लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, लोकसभेत शिंदे गटाचे संख्याबळ 13 वर

मुंबई | प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला अखेर लोकसभा सचिवालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत बुलेटिन लोकसभा सचिवालयाने जारी केले असून, या निर्णयामुळे संबंधित सहा खासदार आता कायदेशीर आणि संसदीयदृष्ट्या शिंदे गटाचे सदस्य म्हणून मान्य झाले आहेत.

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर विलीनीकरणाला शिक्कामोर्तब

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता आणि शिंदे गटात विलीनीकरणाची मागणी केली होती. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने विलीनीकरणास मंजुरी दिली.

ठाकरे गटाने घेतली होती कायदेशीर भूमिका

या प्रक्रियेदरम्यान ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे लेखी निवेदन सादर करून, मूळ पक्षाने कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे नमूद केले होते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. तसेच बंडखोर खासदार अपात्र ठरतील, असा दावाही ठाकरे गटाने केला होता.

शिंदे गटाचे लोकसभेतील संख्याबळ 13 वर

लोकसभा सचिवालयाच्या निर्णयामुळे संबंधित खासदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार सध्या दूर झाली आहे. या निर्णयानंतर लोकसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदारांचे संख्याबळ अधिकृतपणे 13 झाले आहे. तसेच या गटाचे नेते म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घडामोडींचा घटनाक्रम

  • 14 जून : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली; 9 पैकी केवळ 4 खासदार उपस्थित.
  • 16 जून : सहा खासदार दिल्लीला रवाना.
  • 17 जून : लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गटाची आणि विलीनीकरणाची मागणी.
  • त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडे निर्णय प्रलंबित.
  • अखेर आज अधिकृत बुलेटिनद्वारे विलीनीकरणास मंजुरी.

बंडखोर खासदारांनी मांडलेली प्रमुख कारणे

1) पक्षातील हस्तक्षेपाचा आरोप

बंडखोर खासदारांनी पक्षात संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांचा वाढता हस्तक्षेप असल्याचा आरोप केला. पक्षातील निर्णयप्रक्रियेत संवादाचा अभाव असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

2) मतदारसंघ विकासाबाबत नाराजी

मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी आणि पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप बंडखोर खासदारांनी केला. या संदर्भात अनेकदा बैठकांची मागणी करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले.

0
0

Leave a Reply

Realted News