तलाठ्याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

तलाठ्याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाचा एसीबीच्या जाळ्यात

पुणे : महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मुळशी तालुक्यातील माण गावचे तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला तलाठी हा पुण्याचे माजी आमदार Ravindra Dhangekar यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या भावाचे नाव नोंदविण्याचे काम प्रलंबित होते. बहीण व भावामध्ये हक्कसोड पत्र झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी राणे याने तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे एसीबी तपासात उघड झाले.

यापैकी १ लाख रुपये राणे याने यापूर्वीच स्वीकारले होते. उर्वरित २५ हजार रुपयांसाठी तो तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावत होता. त्यामुळे तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने सापळा रचला.

मंगळवारी माण येथील तलाठी कार्यालयात एसीबीच्या पथकाने कारवाई करत २५ हजार रुपये स्वीकारताना संतोष राणे याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0
0

Leave a Reply

Realted News