दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ कळमेश्वरात विशाल मोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ कळमेश्वरात विशाल मोर्चा; विविध पक्ष व संघटनांचा सहभाग


महिलांची लक्षणीय उपस्थिती; सभेत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका, आंदोलकांकडून घोषणाबाजी

दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींवर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २४ जुलै) कळमेश्वर येथे सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विशाल क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात महिला, युवक व युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चामुळे परिसर घोषणांनी दुमदुमून गेला.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंगेश गमे, बिरजू रघुवंशी आणि अविनाश गोतमारे यांनी पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा मुख्य मार्गाने ब्राह्मणी फाटा येथे पोहोचला. तेथे राजमाता अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना नगरसेवक संजय धोंगडी, राजेश श्रीखंडे, दादा भिंगारे आणि राजू सुके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात विविध घोषणा दिल्या. जंतर-मंतरवरील घटनेचा निषेध, नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच ईव्हीएम संदर्भातील घोषणाबाजी करण्यात आली.

यानंतर बाबाराव कोढे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक अरुण वाहाणे यांनी केले. यावेळी राहुल हिवराळे, सूर्यकांत अतकरी, क्रांतिकारी विद्यार्थिनी कु. आचल ओमराज वासनिक, माजी सभापती विभाताई निंबाळकर, शितल कांडलकर आणि विजय ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान अरुण सहारे यांनी क्रांतिकारी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले.

या मोर्चा व सभेला वैभव भोंगे, विलास मानकर, मीनाक्षी मेश्राम, दीक्षा देवळे, रूपाली मेश्राम, संध्या ऊके, दादाराव तागडे, विजय कापसे, मृणाली इंद्रकुमार तागडे, वैशाली इंगळे, कौशल्या लोहकरे, सुजाता मेश्राम, विलास बारमासे, लता खडसे यांच्यासह हजारो महिला, युवक आणि युवती उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी गंगाधर नागपूरे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने क्रांती मोर्चाची सांगता झाली.

0
0

Leave a Reply

Realted News