२० ते २४ जानेवारी २०२७ दरम्यान कुस्तीचा महासंग्राम
राज्यभरातील १३०० मल्ल भिडणार, मॅट आणि मातीतील कुस्तीचा रंगणार थरार!
का टा वृत्तसेवा | स्वरूप मुडे
नागपूर : महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा अभिमान आणि मल्लांच्या बाहुबलाची कसोटी मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार तब्बल १३ वर्षांनंतर नागपूरच्या मातीत रंगणार आहे. येत्या २० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागपूरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील सुमारे १३०० कुस्तीपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. त्यामुळे विदर्भाच्या क्रीडाविश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघाचा पुढाकार
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. लकडगंज परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर कुस्तीचा हा भव्य आखाडा सजणार आहे. तब्बल १३ वर्षांनंतर नागपूरला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने स्थानिक कुस्तीप्रेमी, आखाडे आणि नवोदित खेळाडूंमध्ये विशेष उत्सुकता आहे.

४२ शहरांतील मल्लांचा सहभाग; १३०० कुस्तीपटूंचे आव्हान
राज्यातील तब्बल ४२ शहरे आणि विविध तालमींचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सुमारे १३०० मल्ल विविध वजनगटांत प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणार असून, प्रत्येक लढतीत विजयासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. राज्यातील नामांकित आणि उदयोन्मुख कुस्तीपटूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण ठरणार, याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.
मॅटचे दोन, तर मातीचे दोन आखाडे
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक आणि पारंपरिक कुस्तीचा एकाच मैदानावर अनुभव मिळणार आहे. स्पर्धेसाठी दोन मॅटचे आणि दोन मातीचे असे एकूण चार आखाडे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आधुनिक कुस्तीतील तंत्र-कौशल्यासोबतच पारंपरिक मातीतील कुस्तीचे डावपेच आणि ताकदीचा थरारही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा आणि स्पर्धेच्या व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येत आहे.
विदर्भाच्या कुस्तीला मिळणार नवी ऊर्जा
‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब महाराष्ट्रातील प्रत्येक कुस्तीपटूसाठी प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा विषय आहे. या स्पर्धेत सहभागी होणे आणि विजेतेपद मिळवणे हे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. त्यामुळे नागपुरात होणारी ही स्पर्धा केवळ कुस्तीचा खेळ नसून विदर्भातील कुस्ती संस्कृतीला नवी चालना देणारा महत्त्वपूर्ण सोहळा ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १३ वर्षांनंतर नागपूरला या स्पर्धेचे यजमानपद मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या महासंग्रामामुळे नागपूरच्या क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे नवे पर्व सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आता प्रतीक्षा एका नावाची… यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण? राज्यभरातील दिग्गज मल्लांच्या ताकदीचा कस लागणाऱ्या या महासंग्रामात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून
स्वरूप मुडे : 📲 9881818346





